प्रशासनाच्या पाठबळाने वाळू उपसा जोरात!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात कारवाईसाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रशासनाविषयी आपण ऐकले असतील.

मात्र जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात चक्क प्रशासनाच्या पाठबळावर वाळू तस्करांकडून वाळू उपास जोरात सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावातील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे.

या वाळू उपशाला प्रशासनाचे पाठबळ असून हा वाळू उपसा न थांबल्यास श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अतुल लोखंडे यांनी दिला.

लोखंडे म्हणाले, माठ, म्हसे व परिसरातील गावातून अंदाजे 30 ते 35 हैड्रोलीक बोटींच्या माध्यमातून वाळू उपसा होत असून दररोज 100 ते 150 वाळूच्या ट्रकांची या ठिकाणावरून अवैधरीत्या वाहतूक होत आहे. या अवजड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

वाळूतस्कर स्थानिकांशी संगनमत करून अवैधरित्या हा व्यवसाय चालू ठेवत आहे. दरम्यान शिरूर ( जि. पुणे ) येथील महिला तहसीलदार यांना याची जाणीव होताच त्यांनी आपली हद्द सोडून अगदी बेधडकपणे या भागात येऊन कार्यवाही केली होती. मात्र श्रीगोंदे तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासन बघ्यांची भूमिका घेताना दिसत आहे.

जर हे वेळीच थांबलं नाही तर भविष्यात या ठिकाणी टोळी युद्ध होऊन भयंकर प्रकार घडू शकतो. तरी वेळीच हे अवैध व्यवसाय बंद करुन या गावांना दहशत मुक्त करण्याची मागणी लोखंडे यांनी केली आहे.

गांधीगिरी आंदोलन करणार 2 ऑक्टोबरपर्यंत हा वाळू उपसा व वाळू वाहतूक न थांबल्यास श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलीस ठाणे येथे गांधीगिरी करून सर्व अधिकारी यांचा सत्कार करून निषेध नोंदविला जाणार आहे. त्यानंतर 10 दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपोषणाला बसणार आहोत, असेही लोखंडे यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment