Ahmednagar News : नगर तालुक्याला मोठे निसर्गसौंदर्य लाभले आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगा, घनदाट वृक्ष, जंगल आदींमुळे विविध पशु पक्षी प्राण्यांचा अनमोल ठेवा सध्या नगर तालुक्यात आहे. नुकतेच तालुक्यातील जंगल भागामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (२३ मे) वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांची पाहणी करण्यात आली.
या पाहणीत दुर्मिळ औषधी वनस्पतींसह दुर्लभ प्राणी देखील आढळून आले. दरम्यान या पाहणीमध्ये नगर तालुक्यामधील जंगल परिसरात हरिण व रानडुकरांचा सर्वाधिक वावर आढळून आलाय. तसेच इतर वन्यप्राण्यांचाही मुक्त संचार पाहावयास मिळाला. वनविभाग दरवर्षी जंगलामध्ये वन्य प्राण्यांची पाहणी व अभ्यास करत असते.
बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वनविभाग ही पाहणी करते. वनविभागाच्या पाहणीत तालुक्यात सर्वाधिक हरिण व रानडुकरांची संख्या आढळून आली आहे. त्याचबरोबर काळवीट, ससा, लांडगा, साळींदर,
जंगली मांजर, उदमांजर, कोल्हा, तरस, खोकड, मोर याशिवाय विविध जातींच्या पक्षांचा संचार दिसून आला आहे. रात्री पाणवठ्याजवळ वन्य प्राण्यांची पाहणी करण्यात येते. तसेच पदमार्ग, ठसे यावरून प्राण्यांचा संचार लक्षात येतो. तालुक्यात आठ गावांत वन्यप्राण्यांची पाहणी करण्यात आली.
नगर तालुक्यात कोठे आहे जंगलक्षेत्र
वनविभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. नगर तालुक्यात जेऊर, डोंगरगण, चांदबीबी महाल, ससेवाडी, रांजणी, गुंडेगाव, विळद, कामरगाव आदी ठिकाणी जंगलक्षेत्र आहेत. नगर तालुक्यातील बहुतांशी भागात गर्भगिरीच्या डोंगर रांगा आहेत.
उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी वनविभागाच्या वतीने करण्यात आली असून १८ पाणवठे बनविण्यात आलेले आहेत. तर नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.
यातील जेऊर येथे वनरक्षक मनेष जाधव, वनमित्र शशिकांत पवार, विद्यासागर पेटकर, डोंगरगण येथे वनरक्षक अमोल गोसावी, चांदबीबी महाल वनरक्षक ए.आर. खेडकर, ससेवाडी वनरक्षक बी.एन. रणसिंग, रांजणी वनरक्षक व्ही.ए. चेमटे, गुंडेगाव वनरक्षक एम.एस. इंगळे, विळद वनरक्षक ए.एम गाडेकर, कामरगाव वनरक्षक के.एम. गायकवाड यांनी उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी केली.
दुर्मीळ औषधी वनस्पतींचा खजिना
वनक्षेत्रात विविध दुर्मीळ औषधी वनस्पतींचा खजिना आढळून येतो. येथे अनेक विविध प्रकारचे औषधी झाडे देखील आहेत.