संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल अटीतटीचा लागला. चुरशीच्या या लढतीमध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी बाजी मारली. या लढतीमध्ये सुजय विखेंना पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर काल डॉ. विखे यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
विखे यांना मानणाऱ्या अनेकांनी ही पोस्ट शेअर करत स्टेटस, स्टोरीला ठेवत आपल्या नेत्याप्रती आदर व्यक्त केला आहे या पोस्टमध्ये माजी खासदार विखे यांनी म्हटले आहे की, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी बहुमोल योगदान देऊन माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदान केले
मात्र या जनाधारात थोड्याफार फरकाने पराभव जरी पत्करला असला तरीही मी आपणास आश्वासन देतो की, ज्या तत्परतेने मागील पाच वर्ष जनहिताची कामे केली. त्याच जोशाने इथून पुढे देखील आपल्या सेवेत राहणे पसंद करेल.
निवडणुका येतात आणि जातात. कधीतरी पराजयाचा देखील सामना करावा लागतो परंतु अखेरीस या गोष्टी बाजूला ठेवून समाजासाठी नेहमी योगदान देत राहणे हे खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते आणि येणाऱ्या काळात मी ते पुरेपूर पार पाडेल. आपण मला जी साथ दिली, त्याबद्दल आपले मनस्वी आभार.
तसेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे कार्यकर्ते, नेते पदाधिकारी यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत.
निवडणूक मतदानानंतर विखे माध्यमांसमोर आले नव्हते. काल मतमोजणी दरम्यान ते एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये दाखल झाले होती परंतु लंके यांनी आघाडी घेतल्यावर त्यांनी मतदान केंद्र सोडले होते.
पराभवानंतर विखे यांची भूमिका काय? याची उत्सुकता विखे समर्थकांसह विरोधकांनाही लागली होती. काल दुपारी विखे यांनी सोशल मीडियावर टाकलेली भावनिक व राजकीय परिपक्वता दाखवणारी पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. तसेच चर्चेचा विषय देखील ठरली