श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या चाळीस वर्षीय सुभद्रा राजेंद्र मुंढेकर या महिलेचा मृतदेह कोरेगाव जि. सातारा येथे आढळुन आला होता. पोलिस तपासात या महिलेचा खून राजेंद्र देशमुख रा. मुंढेकरवाडी व बिभीषण चव्हाण रा. बाभूळगाव ता. इंदापूर या दोघांनी करून कालव्यात फेकून दिला असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार मयत महिला ही घरात काहीही न सांगता निघून गेली होती. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. श्रीगोंदा पोलीस या गुन्ह्याच्या तपासात असतानाच कोरेगाव (सातारा) येथील कालव्यात महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाली.

प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व हातातील अंगठी नातेवाईकांना दाखवण्यात आली. सदर वस्तू या सुभद्रा मुंढेकर यांच्याच असल्याचे समोर आले. या वस्तूवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी राजेंद्र जगनाथ देशमुख रा मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा, बिभीषण सुरेश चव्हाण रा बाभळगाव ता इंदापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सुभद्रा मुंढेकर यांचा साताऱ्या जवळ गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात टाकून दिला असल्याची कबुली दिली.
ही घटना कोरेगाव जि. सातारा हद्दीत घडली असल्याने श्रीगोंदा पोलीसानी वरिल दोन्ही आरोपी कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. कोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.