पैशांची बचत आणि बचत केलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक ही बाब तुमच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक जण गुंतवणूक करताना ज्या ठिकाणाहून केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात व केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून देखील विचार करूनच गुंतवणूक करतात.
गुंतवणुकीसाठी प्रामुख्याने बँकांच्या एफडी योजनांना खास करून प्राधान्य दिले जाते व सरकारच्या ज्या काही अल्पबचत योजना आहेत त्यांच्यामध्ये देखील गुंतवणूक केली जाते. परंतु या पद्धतीनेच पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक योजना आहेत व त्यामध्ये पैसे गुंतवणे हे फायद्याचे ठरते.
ज्याप्रमाणे बँकांच्या एफडी स्कीम म्हणजेच मुदत ठेव योजना आहेत त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसची देखील एफडी स्कीम म्हणजेच मुदत ठेव योजना आहे. नुकतेच पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मधील व्याजदर वाढवण्यात आलेले असून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना चांगले व्याज मिळत आहे.
पोस्ट ऑफिसची एफडी स्कीम आहे गुंतवणुकीसाठी फायद्याची
तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या या मुदत ठेव योजनेमध्ये एक लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त 7.50% दराने व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवलेले पैसे हे सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्या माध्यमातून पैशांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही व 100% परताव्याचे हमी देखील मिळते.
पोस्ट ऑफिसच्या या एफडी स्कीममध्ये गुंतवणुकीच्या कालावधीनुसार वेगवेगळ्या प्रकारचा व्याजदर दिला जातो. उदाहरणच घ्यायचे झाले तर एक वर्षाची एफडी केली तर यामध्ये तुम्हाला 6.90% दराने व्याज मिळते, तर पाच वर्षाची एफडी केली तर ग्राहकांना 7.50% दराने व्याज मिळते. दोन वर्षाच्या गुंतवणुकीवर सात टक्के तर तीन वर्षाच्या एफडीवर 7.10 टक्के व्याजदर मिळतो.
किती वर्षाच्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती पैसे मिळतील?
1- एक वर्षाकरिता एक लाख रुपये गुंतवल्यावर– समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या मुदत ठेव योजनेमध्ये एका वर्षाकरिता एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावर 6.90% व्याज मिळेल व यानुसार तुम्हाला एका वर्षात एकूण व्याज सात लाख 81 हजार रुपये मिळेल. एक वर्षाची एफडी परिपक्व झाल्यानंतर तुम्ही जर पैसे काढले तर एकूण मुद्दल 1 लाख व व्याज 7081 असे मिळून तुम्हाला एक लाख 7 हजार 81 रुपये परत मिळतील.
2- दोन वर्ष कालावधीकरिता एक लाख रुपये गुंतवल्यावर– तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दोन वर्षाकरिता एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सात टक्के इतका व्याजदर मिळतो व त्यानुसार तुम्हाला 14888 रुपये व्याज मिळेल. अशापद्धतीने तुम्हाला ही योजना परिपक्व झाल्यानंतर एक लाख 14 हजार 888 रुपये मिळतील.
3- 3 वर्षाच्या कालावधी करीता एक लाखाची एफडी केल्यावर– समजा एक लाख रुपये तुम्ही तीन वर्षाच्या कालावधी करिता गुंतवले तर तुम्हाला पोस्ट ऑफिस 7.10% दराने व्याज देईल. त्यानुसार तुम्हाला तीन वर्षांनी 23 हजार पाचशे आठ रुपये व्याज एक लाख गुंतवणुकीवर मिळेल व ही योजना परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला एकूण व्याज व मुद्दल पकडून एक लाख 23 हजार पाचशे आठ रुपये मिळतील.
4- पाच वर्षाच्या कालावधीकरिता एक लाख रुपयांची एफडी केल्यावर– समजा तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून यावर 7.50% इतके व्याज मिळते. यानुसार तुमची व्याजाची रक्कम पाच वर्षात होते 44 हजार 995 रुपये आणि मॅच्युरिटी वर तुम्हाला एकूण पैसे मिळतात एक लाख 44 हजार 995 रुपये.
अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मध्ये 1 लाख रुपयाची पाच वर्षाकरिता गुंतवणूक केली तर तुम्हाला 44 हजार पेक्षा जास्त व्याज मिळते.