MP Nilesh Lanke : अपघाताने भेट झाली तरी ती चुकच ! गजा मारणेच्या भेटीसंबंधात खा. नीलेश लंके यांचा खुलासा 

Ahmednagarlive24
Published:
गुरूवारी पुण्याच्या दौऱ्यात असताना त्या व्यक्तीची झालेली भेट ही अपघाताने झाली होती. सांत्वनपर भेट घेऊन परतत असताना ती व्यक्ती भेटली, ती व्यक्ती कोण ? तीची पार्श्‍वभुमी काय याबाबत मला काहीही माहीती नव्हते. ती व्यक्ती गुंड आहे हे मला शुक्रवारी सकाळी वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून समजले. अर्थात अपघाताने भेट झाली तरी ती चुकच होती अशी कबुली खा. नीलेश लंके यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.
गुरूवारी खा. नीलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्या घरी जाऊन सत्कार स्विकारल्यानंतर विविध माध्यमांमधून त्याच्या बातम्या झळकल्या. सत्ताधारी पक्षाकडूनही लंके यांच्यावर टीका करण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना लंके यांनी हा खुलासा केला आहे.
पत्रकारांशी बोलताना लंकेे म्हणाले, दिल्लीमध्ये कागदपत्रांची पुर्तता करून गुरूवारी मतदारसंघात जाताता  पुणे विमानतळावर मी उतरलो. पुण्यात कुस्तीमधील नामांकित मल्ल असलेल्या पवार यांचे कॅन्सरच्या आजाराने आठ दिवसांपूर्वी  दुर्देवी निधन झाले. त्यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी विमानतळावरून मी गेलो होतो. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेचे पदाधिकारी प्रविध धनवे यांच्या घरी भेट देऊन परतत असताना संबंधित व्यक्तीने मला घरी चहा पिण्यासाठी येण्याचा आग्रह धरल्याचे लंके म्हणाले.
लंके पुढे म्हणाले, राजकारणात, समाजकारणात काम करताना कोणत्याही व्यक्तीने हात केला तर थांबून त्याच्याशी बोलावे लागते. सबंधित व्यक्तीची पार्श्‍वभुमी मला माहीती नव्हती. असे असताना एखादी व्यक्ती आग्रहाने बोलवित असेल तर आपण गेले पाहिजे. त्यांच्या घरी जाऊन आम्ही चहा घेतला. त्यानंतर त्यांनी माझा सत्कार केला. सकाळी ज्यावेळी वृत्तवाहिन्यांवर बातम्या सुरू झाल्या त्यावेळी मला सबंधित व्यक्तीची पार्श्‍वभूमी माहिती झाली. केवळ अपघाताने हा प्रकार घडलेला आहे. अशा प्रकारांशी अथवा संबंधित व्यक्तीशी माझा कोणताही हितसबंध नसल्याचे लंके यांनी स्पष्ट केले.
कुख्यात गुंड गजा मारणे याच्याकडून तुम्ही सत्कारही स्विकारला. सत्ताधाऱ्यांकडून त्यावर टीकेची झोड उठविली जाते असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर लंके म्हणाले, आपणास सबंधित व्यक्तीची पार्श्‍वभुमी माहीती असायला हवी. मला जर वस्तुस्थिती काय आहे हे माहीती असते तर मी थांबलोच नसतो. त्या भागात सांत्वनपर भेटीसाठी आम्ही गेलो होतो. रस्त्याने जाताना त्या व्यक्तीने थांबविल्यावर आम्ही थांबलो. त्या व्यक्तीच्या भेटीचे कोणतेही नियोजन नव्हते.
एखाद्या नियोजित कार्यक्रमास जायचे असेल तर आपण पार्श्‍वभुमी माहीती करून घेत असतो. मात्र इथे अचानकपणे एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्याच्या कपाळावर तर काही लिहिलेले नसते की तो कोण आहे ? काय आहे ? आम्ही ग्रामीण भागातील आहोत. आम्हाला शहरातील परिस्थिती माहीती नसते असा खुलासा करतानाच अपघाताने ही भेट झाली तरी ती चुकच होती अशी कबुलीही लंके यांनी दिली आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe