कशाला डीएपी खतावर खर्च करता? डीएपी खताला वापरा ‘ही’ पर्यायी खते आणि उत्पादनात करा भरघोस वाढ

Ajay Patil
Published:

पिकांची लागवड केल्यानंतर त्या पिकांपासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर विविध पद्धतीचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते व यामध्ये पिकांच्या खत व्यवस्थापनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण खतांच्या माध्यमातूनच पिकांना आवश्यक असलेल्या पोषक घटकांची पूर्तता केली जाते व पर्यायाने मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते.

रासायनिक खतांच्या बाबतीत जर आपण बघितले तर जेव्हा रासायनिक खतांची गरज भासते तेव्हा काही ठराविक खतांना  शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणात मागणी असते व अशाच प्रकारची खते ही जास्त दराने विकली जातात व शेतकऱ्यांचा त्यामुळे उत्पादन खर्च वाढतोच व आर्थिक लूट देखील होते. अशा खतांमध्ये प्रामुख्याने डीएपी या खताचा अंतर्भाव होतो.

कारण आपल्याला माहित आहे की बऱ्याच शेतकऱ्यांकडून डीएपी या खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते व इतर खतांच्या तुलनेमध्ये या खताची किंमत देखील जास्त असते.जर आपण डीएपी खतामधील रासायनिक मात्रा पाहिली तर यामध्ये 40 टक्क्यांपर्यंत स्फुरद असते व 18 टक्के नत्र असते.

परंतु डीएपी खताची कमतरता भरून काढायची असेल तर याकरिता शेतकरी बंधूंनी काही पर्यायी खते वापरणे खूप गरजेचे आहे. स्फुरदयुक्त खते पाहिली तर यामध्ये डीएपी नंतर सिंगल सुपर फॉस्फेट या खताला सर्वाधिक मागणी असते व यालाच एसएसपी असे देखील म्हटले जाते.

 डीएपी ऐवजी वापरा ही पर्यायी खते

डीएपी खताला जास्त मागणी असल्यामुळे या खताला पर्याय म्हणून दुसरे काही महत्त्वाच्या खतांचा वापर केला तरी उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते. स्फुरदयुक्त खतांमध्ये डीएपी नंतर सिंगल सुपर फॉस्फेट या खताला जास्त मागणी असते व हे खत देशातच तयार होते. सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच एसएसपीमध्ये 16% स्फुरद आणि त्यासोबत सल्फर व इतर महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्य असतात.

खतामध्ये असलेल्या सल्फरमुळे तेलबिया पिकांमध्ये जर याचा वापर केला तर खूप फायदा मिळतो. डीएपीच्या एक गोणी ऐवजी जर युरियाची अर्धी गोणी आणि सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच एसएसपीच्या तीन गोण्या वापरल्या तर डीएपी खताला हा एक चांगला पर्याय आहे. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट या खतासोबतच संयुक्त खतांचा वापर देखील फायदेशीर ठरतो.

या संयुक्त खतामध्ये 10:26:26,20:20:0:13,12:32:16 आणि एनपीके 15:15:15 या खतांच्या वापरामुळे देखील नत्र व स्फुरद या सोबतच पालाश सारखे महत्त्वाचे अन्नद्रव्य पिकांना मिळतात. त्यामुळे डीएपी ऐवजी संयुक्त  खतांचा वापर देखील पिकांसाठी फायद्याचा ठरतो.

तसेच टीएसपी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट या खतामध्ये देखील 46 टक्के स्फुरद असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी ट्रिपल सुपर फॉस्फेट म्हणजे टीएसपी एक गोणी खताचा वापर केल्यास तो देखील डीएपीला चांगला पर्याय ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe