जून महिना सुरु झाला आणि पावसालाही वेळेत सुरवात झाली. त्याचबरोबर मुलांच्या शाळाही सुरु झाल्या. दरम्यान पावसाळ्यात विविध आजार पसरू शकतात असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे पावसाळ्यात संसर्ग पसरण्याचे प्रमाण वाढलेले असते.
हवामानातील वाढत्या आर्द्रतेमुळे जीवजंतू वाढण्यास पोषक वातावरण तयार झालेले असते. त्यामुळे पावसाळ्यात मुलांचे होणाऱ्या इन्फेक्शनपासून काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात ओले आणि दमट वातावरण यामुळे जंतू वाढतात. त्यामुळे पावसाळ्यातील रोगांचा झपाट्याने प्रसार होतो.
डास चावणे, दूषित पाणी, दूषित अन्न तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने होणारे संसर्गजन्य आजार या सर्व बाबींचा विचार करता लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. मुलांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असायला हवी. पावसात भिजल्याने ओले कपडे अंगावर अधिक वेळ राहिल्यास त्यांना गजकर्ण, चिखल्या, फंगल इन्फेक्शन असे त्वचारोग होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून शरीर कोरडे करा.
फ्लू आणि ताप : ज्या मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असते, अशा मुलांना इन्फ्लुएंझा जिवाणूचा हल्ला सहन होत नाही, याला फ्लू असे म्हणतात. हा रोग एका बाळाकडून दुसऱ्या बाळाकडे पसरतो. फ्लूचे लसीकरण करून घ्यावे. तसेच पावसात भिजल्याने तापही येऊ शकतो
टायफॉईड, गॅस्ट्रो, कावीळ : पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थ, उघड्यावरील अन्नपदार्थ, शिळे अन्नपदार्थ खाणे टाळावे. बाहेरचे पाणी पिणे टाळावे. त्यामुळे टायफॉईड, गॅस्ट्रो, कावीळ (पिवळी कावीळ) चा संसर्ग होऊ शकतो. हे अतिशय धोकादायक आहे.
योग्य स्वच्छता
घरात योग्य स्वच्छता ठेवायला हवी. लहान मुलांना ओले कपडे घालू नये. शरीर कोरडे आणि स्वच्छ ठेवावे. त्यांना सकस आहार द्यावा, त्यांचे पिण्याचे पाणी स्वच्छ, निर्जंतुक असावे, त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. त्यांना अंगभर कपडे घालावे, जेणेकरून त्यांना डास चावणार नाही. मुलांना सार्वजनिक ठिकाणी नेताना मास्क घालावा. फ्लूचे लसीकरण करून घेतले पाहिजे असे बालरोगतज्ज्ञ सांगतात.