सोनेवाडीत ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ उपक्रम उत्साहात

सोनेवाडी (चास) मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ हा पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. मंगळवारी (दि.२५) किर्लोस्कर फेरस (ISMT limited) कंपणीतर्फे जनरल मॅनेजर चैतन्य शिंदे, एच.आर. मॅनेजर कैलास गुरव यांनी दोन्ही शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना केशर आंब्यांच्या रोपांचे वाटप केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मच्छिंद्रनाथ येणारे यांनी भूषवले. या वेळी कंपनीचे अमोल दहिवळ उपस्थित होते. सरपंच विठ्ठल दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सोनेवाडी ग्रामस्थ व दोन्हीही विद्यालयांच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमावेळी चैतन्य शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन केले.

शालेय जीवनातील खडतर प्रवास ते जनरल मॅनेजर पर्यंतची मजल असा प्रवास कथन केला. कोरोना महामारीच्या काळात कंपनीच्या वतीने ऑक्सिजन सिलेंडर पुवून अनेकांचे प्राण वाचविले. तसेच वर्षभर अनाथालयामध्ये मदतीचा हात देऊन मोलाचे सामाजिक कार्यही घडत असते असेही ते म्हणाले.

प्रत्येक विद्यार्थ्याने आंबा वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करावे यासाठी त्याची परीक्षण समिती नेमण्यात आली. वर्षभरानंतर प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. कार्यक्रम यशस्विततेसाठी गीतेश्वर दळवी यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र दळवी यांनी केले. यावेळी आबासाहेब दळवी, अर्जुन वारे, निलेश काळे, पांडुरंग शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन दळवी, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दीपक काकडे, शिक्षक देविदास दळवी, सतीश सूंबे, बिभीषण गावडे, रंजना कराळे, प्रशांत दळवी, प्राथमिक शाळेचे इंगळे व स्टाफ उपस्थित होता.