महाराष्ट्र म्हटला म्हणजे निसर्गसौंदर्याची जणू खाणच आहे. कारण महाराष्ट्राला देशातील इतर राज्यांपेक्षा निसर्गाने खूपच वरदहस्ताने आणि भरभरून दिले आहे. महाराष्ट्रात सर्व बाजूंनी अनेक निसर्गाने समृद्ध असलेले पर्यटन स्थळे असून या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या काही लाखोत आहे. या ठिकाणी असलेली गड किल्ले तसेच डोंगररांगांनी सजलेले राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या सीमा तसेच विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला कोकण पृथ्वीवरील स्वर्गच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
त्यामुळे तुम्हाला उन्हाळा असो किंवा पावसाळा अशा प्रत्येक ऋतूमध्ये जर कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या स्थळांना भेटी देता येणे महाराष्ट्र शक्य आहे. याच अनुषंगाने सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू असून या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत जाऊन महाराष्ट्रातील काही ठिकाणी भेट देऊन तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद लुटू शकतात.

पावसाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणांना भेट म्हणजे जणू काही स्वर्गच
1- माळशेज घाट– अहमदनगर ते कल्याण रस्त्यावर या घाटातून जात असताना रिमझिम किंवा मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये चिंब भिजण्यासाठी उत्तम असे ठिकाण आहे. या ठिकाणी जर तुम्ही थोडासा जरी हात उंच केला तरी तुमच्या हातात ढग येतील असे दृश्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात.
लांबवर पसरलेल्या दऱ्या खोऱ्या पाहण्याची मजा देखील या ठिकाणी काही वेगळीच असते. त्यामुळे फोटोग्राफीचा छंद असलेल्या लोकांची ही एक आवडती जागा आहे. या घाटाच्या जवळ हरिचंद्र गड आहे.तसेच माळशेज घाटाच्या अगोदर तुम्हाला मुरबाड या ठिकाणी पळूचा धबधबा देखील पाहता येतो.
2- चिखलदरा– चिखलदरा हे विदर्भातील एकमेव असे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे व एक हजार मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण खोल दऱ्या, धबधबे तसेच लांबच लांब पसरलेली हिरवाई आणि पर्वतांनी जणू काही अंगावर घेतलेली धुक्याची चादर असे निसर्गचित्र तुम्हाला या ठिकाणी पावसाळ्यात पाहायला मिळेल.
चिखलदरा या ठिकाणी असलेली देवी पॉईंट, पंचबोल पॉईंट आणि वॉटर बोटिंग तसेच बाईकवरून मस्त फिरण्यासाठी भीमकुंड, वनउद्यान इत्यादी प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी आहेत.
3- इगतपुरी– हे नाशिक जिल्ह्यातील एक ठिकाण असून या ठिकाणी वर्षभर कुठल्याही ऋतूमध्ये आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळते.कारण हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच आहे. या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये जलसंपदा आणि वनसंपदा असल्यामुळे तुम्हाला जर निसर्गाचा अनुभव अगदी जवळून घ्यायचा असेल तर इगतपुरी हे ठिकाण खूप फायद्याचे ठरेल.
या ठिकाणी असलेली भातसा नदीचे पात्र तसेच आर्थर लेक, कळसुबाई शिखर तसेच अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरी सागर धबधबा,त्रिनगलवाडी फोर्ट, थालघाट, म्यानमार गेट, अशोका फॉल्स तसेच भावली डॅम आणि घाटनदेवी माता मंदिर इत्यादी ठिकाणी आकर्षणाचे केंद्र आहेत.
3- भंडारदरा– दोन दिवसाची ट्रिप जर काढायची असेल तर मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे एक निसर्ग समृद्ध असे योग्य ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी काजवा महोत्सव भरतो. या ठिकाणी असलेले धबधबे तसेच उंचच उंच डोंगराचे कडे, हिरवीगार झाडे तसेच शुद्ध आणि थंड हवा या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळते.
4- भीमाशंकर– भीमाशंकर हे ठिकाण घनदाट अरण्यांनी समृद्ध असे ठिकाण असून पुणे जिल्ह्यात आहे. भीमा नदीचा उगम याच वनांमधून होतो व हे ठिकाण अतिशय उंचावर असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी डोळ्यांचे पारणे फिटेल असे निसर्गसौंदर्य तुम्हाला बघायला मिळते. भीमाशंकर या ठिकाणी असलेले सिताराम बाबा आश्रम तसेच नागफणी, कोकण कडा व गुप्त भीमाशंकर इत्यादी ठिकाणे पाहण्याचा योग प्राप्त होतो.