गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून आदिवासी बांधवांच्या भात लागवडी थांबल्या असल्याचे चित्र समोर आले आहे. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीवर पोहोचला आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भंडारदऱ्याला मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. १ जुलैपासून ते ७ जुलै पर्यंत भंडारदऱ्याच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे पाण्याने तुडुंब भरले होते.
घाटघर-रतनवाडी या परिसरात भात लागवडी जोमाने सुरू झाल्या होत्या. सतत पडत असलेल्या पावसामुळे भंडारदराच्या इतरही परिसरात भात लागवडीना वेग येण्यास सुरुवात झाली होती.
मात्र दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या परिसरासह पाणलोटातही पावसाने दांडी मारली आहे. भंडारदऱ्याला काल मंगळवारी सकाळपासूनच ऊन पडले होते. सोमवारी संध्याकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली.
काल मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेच्या आसपास भंडारदऱ्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. सलग ७ दिवस झालेल्या मान्सूनने मात्र भंडारदरा धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आवक होऊन धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीच्या पुढे गेला आहे.
फक्त २४ तासांमध्ये घाटघर येथे ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पांजरे येथे ४१ मिलिमीटर पाऊस पडला. रतनवाडी ६३ मिलिमीटर तर भंडारदरा येथे ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३२५५ दशलक्ष घनफूट झाला असून भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची २१८ दशलक्ष घनफूट आवक झाली आहे. वाकी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून धरणावरून ३५६ क्युसेसने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत आहे.
मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३३४३ दशलक्ष घनफूट झाला असून भंडारदरा धरण ३० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रामध्ये काल मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपासून पुन्हा पावसाचे आगमन सुरू झाले आहे.