Waterfalls In Maharashtra:- महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे पावसाचा जोर सुरू असून जवळपास पावसाळा सुरू होऊन एक ते सव्वा महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे आता सगळीकडे निसर्गाने हिरवा शालू पांघरल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी नदी नाले, ओढे आणि धबधबे प्रवाहीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नक्कीच आता पर्यटकांची पावले अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत व मोठ्या प्रमाणावर अशा स्थळांवर गर्दी होत आहे.
पावसाळ्यामध्ये बहुसंख्य पर्यटक हे निसर्ग पर्यटन स्थळांना भेट देतात व त्या ठिकाणी असलेली धबधबे पाहण्याला मोठ्या प्रमाणावर या कालावधीत पसंती दिली जाते. धबधबे हा एक निसर्गाचा उत्कृष्ट आविष्कार असतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे रिमझिम पडणाऱ्या पावसाळ्यात अशा ठिकाणी भेट देणे म्हणजे जणू स्वर्गालाच भेट देण्यासारखे होते.
याकरिता तुम्हाला देखील या पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या धबधबे पाहायची इच्छा असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या धबधब्यांना भेट देऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यावर निसर्गाच्या सानिध्यात स्वर्गसुख तर मिळेलच परंतु दररोजच्या ताण तणावाच्या जीवनापासून काही काळ का होईना मनाला शांतता लाभेल. याकरिता आपण या लेखात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या धबधब्यांची थोडक्यात माहिती बघू.
महाराष्ट्रातील हे धबधबे निसर्ग आणि पावसाचा आहे अतुट संगम
1- ठोसेघर धबधबा– पश्चिम महाराष्ट्र हा निसर्गाने समृद्ध असून पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा जिल्ह्यात हा धबधबा आहे. साताऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधबा असून हा जवळपास 500 मीटर उंच असा धबधबा आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेले हे ठिकाण असून या ठिकाणी मनाला शांतता लाभते.
2- लिंगमळा धबधबा– तुम्हाला जर लिंगमळा धबधबा पाहायचा असेल तर तुम्ही महाबळेश्वरला गेल्यावर त्या ठिकाणाहून या धबधब्याला जाता येते व महाबळेश्वर ते लिंगमळा धबधबा हे अंतर सहा किलोमीटर आहे. हा देखील एक सुंदर असा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर याकडे आकर्षित होतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पर्यटकांची गर्दी तुम्हाला बघायला मिळते.
3- दुगरवाडी धबधबा– महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा देखील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप प्रसिद्ध असून या ठिकाणी देखील अनेक पर्यटन स्थळे आहेत. दुगरवाडी धबधबा देखील नासिक जिल्ह्यात असून नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. दुगरवाडी धबधब्याच्या आजूबाजूला हिरवीगार दाट झाडे असून यामध्ये दुगरवाडी धबधब्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते.
4- रंधा धबधबा– हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात असून त्या ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळ भंडारदरा असून बारा किलोमीटर अंतरावर आहे. रंधा धबधबा हा निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेला असल्याचे आपल्याला दिसून येते व या ठिकाणी गड किल्ले असलेल्या डोंगर रांगेत हा धबधबा आहे.
5- वजराई धबधबा– हा धबधबा देखील सातारा जिल्ह्यात आहे व सातारा जिल्ह्यातील जगात प्रसिद्ध असलेल्या कास पठार जवळ आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सुंदरता आणि धबधब्याचे लोकेशन खूप सुंदर असल्याने हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आकर्षण असून खूप गर्दी असते.
6- वांगणी धबधबा– हा धबधबा देखील निसर्ग सौंदर्याने नटलेला असून यालाच भगीरथ धबधबा असे देखील नाव आहे. तुम्हाला जर निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत असताना धबधब्याचे रूप अनुभवायचे असेल तर तुम्ही वांगणी धबधब्याला भेट देऊ. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते.
7- पांडवकडा धबधबा– तुम्ही जर मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असाल व त्या ठिकाणी दररोजची गर्दी आणि कोलाहाटा पासून मनाला शांतता हवी असेल तर तुम्ही खारघर जवळील पांडवकडा धबधब्याला भेट देऊ शकतात. हा धबधबा देखील मनाला मोहित करतो व शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून मनाला शांतता देतो.
8- तुंगारेश्वर धबधबा– तुंगारेश्वर धबधबा देखील निसर्गाने नटलेला असून वसई या ठिकाणी आहे. तुंगारेश्वर धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते व ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी तुंगारेश्वर धबधबा हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे