Business Success Story:- जीवनामध्ये सगळेच दिवस हे सुखाचे नसतात किंवा सगळेच दिवस हे दुःखाचे देखील नसतात. फक्त आहे त्या परिस्थितीत जमिनीवर पाऊल ठेवून परिस्थितीशी दोन हात करत जीवन जगण्याला अतिशय महत्त्व असते. यशाच्या बाबतीत देखील हीच बाब प्रकर्षाने लागू होते. यश तुम्हाला एका रात्रीत किंवा झटक्यात असे कधीच मिळत नसते.
तुम्हाला जर एखाद्या व्यवसायामध्ये किंवा इतर क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असतेच. परंतु न डगमगता जिद्दीने एक एक पाऊल पुढे टाकत यशाच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागते व तेव्हा कुठे यश गवसते. हीच बाब जर आपण बघितली तर अनेक यशस्वी उद्योजकांच्या बाबतीत लागू होते
अशाच पद्धतीने जर आपण प्रसिद्ध असे व्यावसायिक संदीप अग्रवाल यांची यशाची कहाणी पाहिली तर ती काहीशी अशीच आहे. जीवनात आलेल्या असंख्य अडचणींवर मात करत या व्यक्तीने आज शून्यातून व्यवसायाला सुरुवात केली आणि अब्जावधीच्या घरात त्यांनी व्यवसाय पोहोचवला आहे.
संदीप अग्रवाल यांची यशोगाथा
संदीप अग्रवाल यांचा जन्म 1972 यावर्षी झाला व महत्त्वाचे म्हणजे जेव्हा ते लहान होते तेव्हा पासून त्यांना आर्थिक म्हणजेच वाणिज्य आणि तंत्रज्ञान या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर आवड होती. परंतु इंग्रजीच्या बाबतीत मात्र त्यांची फार मोठी कमजोरी होती. त्यांना चांगली इंग्रजी बोलता येत नव्हते. परंतु तरी देखील त्यांनी 1994 या वर्षी कुरुक्षेत्र विद्यापीठ हरियाणा येथून कॉमर्समध्ये पदवी संपादन केले आणि नंतर मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले व नंतर वाशिंग्टन विद्यापीठ सेंट लुईस येथे एमबीएचे शिक्षण घेतले.
त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी एमबीए पूर्ण केले तेव्हा स्वतःला त्यांनी फायनान्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रापुरते मर्यादित केले व अमेरिकन स्टॉक मार्केट म्हणजेच वॉल स्ट्रीट मधील अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांनी बारा वर्षे सेवा दिली. परंतु देशात येऊन काहीतरी करावे म्हणून ते भारतात परतले व गुरुग्रामला शॉप क्लूज नावाची कंपनी सुरू केली.
हे नाव माहिती आहे कारण हे एक ऑनलाईन मार्केट प्लस होते व या प्लॅटफॉर्मच्या मदतीने अनेक लहान व मोठ्या व्यवसायांना त्यांचे उत्पादने विकता येत होती. अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन प्लेटफॉर्म कंपनीशी स्पर्धा करत या कंपनीने झपाट्याने प्रगती केली व एक अब्ज डॉलरचे मूल्यांकन देखील पार केले.
ही कंपनी 2011 मध्ये त्यांनी त्यांची पत्नी व एक मित्र यांना सोबत घेऊन अमेरिका व भारतामध्ये सुरू केली होती व ती यशस्वी देखील झाली. परंतु सगळे चांगले सुरू असताना मात्र त्यांची पत्नी राधिका ज्या त्यांच्या व्यवसायिक भागीदार देखील होत्या यांच्याशी काही गोष्टीत मतभेद झाले व संदीप अग्रवाल त्या व्यवसायातून बाहेर पडले.
त्यानंतरच्या काळात शॉपक्लूज कंपनी विकली गेली आणि दुर्दैव म्हणजे संदीप आणि राधिका यांचे नाते देखील संपुष्टात आले. त्यानंतर नशिबाने त्यांच्याशी अनेक प्रकारच्या खेळ केले व त्यांच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणींचा डोंगर उभा राहिला. परंतु या सगळ्या अडचणींना मागे सारत त्यांनी यशाच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला व पुन्हा उठण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
2014 मध्ये लॉन्च केले ड्रुम
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सगळ्या अडचणींमुळे ते खचून न जाता मोठ्या उमेदीने उभे राहिले व 2014 मध्ये ड्रुम नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च केला व तो देखील शॉपक्लूज प्रमाणे एक ऑनलाईन मार्केट प्लेस असून या ठिकाणी जी काही वापरलेली वाहने म्हणजे सेकंड हॅन्ड वाहने असतात त्यांची खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते.
या व्यवसायामध्ये संदीप अग्रवाल यांनी ऑरेंज बुक व्हॅल्यू म्हणजेच ओबीव्हीचे उत्तम वैशिष्ट्य सुरू केले. तसेच ते जे काही सेवा देत होते तिची तपासणी आणि पडताळणी करता येईल याकरता इकोसिस्टम देखील तयार केले. 2015 ते 2018 या कालावधीमध्ये या कंपनीने खूप चांगले काम केले व सातत्याने त्या कंपनीत वाढ होत राहीली
याच कालावधीमध्ये ड्रुमला काही वेंचर कॅपिटल कंपन्यांकडून फंड मिळायला सुरुवात झाली व त्यामुळे त्यांना देशात सेवांचा विस्तार झपाट्याने करता आला. 2018 पर्यंत संदीप अग्रवाल हे भारतीय वाहन बाजार म्हणजेच ऑटो मोबाईल मार्केटमधील एक मोठे व्यक्ती बनलेले आहेत.