Ahmednagar News : जर पारख असेल तर दगडातूनही एखादा हिरा शोधून काढता येतो असे म्हटले जाते. अशीच पारख व कष्ट करण्याची जिद्द अहमदनगरमधील एका शेतकऱ्यास राज्यात लौकिक मिळवून गेली.
शेवगाव तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील असणारे शेतकरी शरद वाणी यांनी अगदी नाद खुळा प्रयोग राबवलाय. शरद वाणी यांनी तयार केलेल्या पिस्तूल या खोंडास बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल नऊ लाख ११ हजार रुपयांची बोली लागलीये.
शेतकऱ्याने केलेल्या या किमयाचे बऱ्हाणपूर व आव्हाणे ग्रामस्थांना देखील अप्रूप वाटत असून गावकऱ्यांनी देखील अगदी जल्लोषात मिरवणूक काढली. इतकेच नव्हे तर यापूर्वी देखील त्यांनी गजा नाव्याच्या बैलावर खर्च व मेहनत करून त्याची अडीच लाख रुपयांना विक्री केली होती.
बैलगाडा शर्यतीसाठी खोंड वासराचा शोध घेणे, त्याची निगा राखणे व त्याला त्यादृष्टीने तयार करणे हे अत्यंत जिकरीचे काम असते. बैलाचा सराव करून घेणे हे त्यापेक्षाही मेहनतीचे काम. असे असले तरी त्यांनी अगदी मेहनीतीने हा छंद गेल्या पाच ते सात वर्षांपासून जोपासत आहेत.
अवघ्या दोन वर्षाच्या या खोंडावर मुंबई येथील बैलगाडा मालक संदीप माळी यांची नजर पडली. पुढील शर्यतीसाठी हा नक्कीच हुकमी एक्का ठरू शकेल या पारखीतून त्यांनी त्यावर ९ लाख ११ हजार रुपयांची बोली लावून तो विकत घेतला.
बऱ्हाणपूर, आव्हाणे खुर्द व बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गुलाल उधळत पिस्तूल बैलाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली. वाणींनी सहा महिने वयाच्या पिस्तूल हा खोंड गेल्या दीड वर्षांपासून शर्यतीच्या तयारीसाठी जोपासला.
त्यासाठी खुराक व पळण्याचा सराव नियमित घेतला. सुरवातीला घोड्यांबरोबर व नंतर बैलांबरोबर असा दुहेरी सराव घेतल्याने राज्यभरातील बैलगाडा क्षेत्रातील व्यक्तींचे त्याकडे आवर्जून लक्ष वेधले.