Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर सात दिवसांत कारवाई करावी अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, अशा इशारा खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी निवेदनाद्वारे दिला आहे.
खासदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख झाली आहे.
शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन क्लब, अवैध वाळूउपसा, गुटखा, अवैध दारूविक्री, मटका, चंदनतस्करी, बिंगे यांसारखे अवैध व्यवसाय सुरू आहेत. गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अवैध व्यवसायांना अभय आहे. हे कर्मचारी अवैध व्यावसायिकांकडून हप्ते वसूल करत आहेत.
गुन्हे शाखेचे कर्मचारी सामान्य जनतेला वेठीस धरतात. तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिस, या दोन्ही आस्थापना वेगळ्या आहेत. असे असताना या दोन्ही शाखांचा पदभार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत अनेक गुन्हे प्रलंबित असून, दोन्ही शाखांचा कारभार एकाच अधिकाऱ्याकडे देणे संशयास्पद आहे. गुन्हे शाखेचे कर्मचारी व्यवसाय करणाऱ्या सराफांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली.
यासह इतर कारणांमुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश करावेत.
कारवाई न झाल्यास पुराव्यासह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.