Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील हवामान सध्या विषम असल्याचे दिसते. ढगाळ वातावरण, पाऊस, मधेच गार वारा तर मधेच उष्ण वातावरण असे सध्या वातावरण दिसून येत आहे. परंतु याचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात सध्या व्हायरल इन्फेक्शन असणारे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालये फुल झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घसा, अंग दुःखीचे रुग्ण आढळून येत आहेत.
नगर शहर आणि उपनगराच्या परिसरात डेंग्यू आणि चिकनगुणिया सदृष्य, इन्फुल्यूंझा या विषाणूजन्य आजाराने पीडित रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे आणि हवेतून पसरणाऱ्या विषाणूमुळे वाढत आहेत.
यामुळे नागरिकांनी प्रामुख्याने डासांची उत्पत्ती रोखण्यासह कोविडच्या नियमाचे पालन केल्यास आजारांचा संसर्ग वाढणार नाही, असे आरोग्य तज्ज्ञांच्यावतीने सांगण्यात आले.
गेल्या १५ दिवसांपासून नगर शहरात आणि जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण आहे. त्यात अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, वातावरणात असणारा गारवा, थंड सोसाट्याचा वारा, पावसामुळे वाढलेले गवत आणि त्यातून उत्पत्ती होणाऱ्या डासांमुळे व्हायरल
आणि तापासह विषाणूजन्य आजारामुळे बांधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात देखील वेगळी परिस्थिती नसून याठिकाणी सर्दी आणि तापाचे रुग्ण संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि कमी तापमानामुळे विषाणूजन्य आजार निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सर्वानीच काळजी घेणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना रुमाल वापरावा.
सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे. वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.