आमिषे झुगारून पारनेरकरांनी स्वाभिमान जपला ! खा.नीलेश लंके यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार

Ahmednagarlive24
Published:

लोकसभा निवडणूकीत धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढत होऊन पारनेर तालुक्यातील जनतेने विरोधी उमेदवाराकडून अनेक अमिषे दाखविण्यात येऊनही आपल्या तालुक्याचा स्वाभिमान जपल्याचे कृतज्ञतापूर्वक उद्गार खासदार नीलेश लंके यांनी काढले.

लोकसभा निवडणूकीत खा. नीलेश लंके यांनी विजय संपादन केल्याबद्दल वडगांव सावताळ ग्रामस्थांच्या वतीने पेढेतुला करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पारनेर तालुक्यातील जनतेने आपणास मताधिक्य देत मला साथ दिली असून भविष्यकाळात जनतेची कामे करण्याची जबाबदारी माझी आहे. माझया या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार सर्वसामान्य जनता आहे हे मी कधीही विसरू शकत नाही. या निवडणूकीत पैसा हारला तर स्वाभिमान जिंकल्याचेही लंके म्हणाले.

गाजदीपुरकडे जाणारा स्वातंत्रपुर्व काळापासूनची मागणी असलेला रस्ता, शाळा खोल्या आदी प्रश्‍न आपण मार्गी लावू अशी ग्वाही खा. लंके यांनी यावेळी दिली. सरपंच संजय रोकडे यांच्यासह सेवा संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ रोकडे यांनी विविध विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबत निवेदन सादर केले. सरपंच संजय रोकडे यांनी त्यांच्या कालखंडात चांगले काम करीत विकास कामे उभी केल्याचे गौरोद्गार खा. लंके यांनी यावेळी काढले.

यावेळी मा. सभापती सुदाम पवार, प्रा. संजय लाकूडझोडे, अ‍ॅड. राहुल झावरे, उद्योजक अजय लामखडे, पोपट साळुंखे, बाळासाहेब खिलारी, रविंद्र झावरे, डॉ. नितीन रांधवन, रावसाहेब आग्रे, सरपंच संजय रोकडे, योगेश शिंदे, कर्ण रोकडे, दादाभाऊ रोकडे, मोहन रोकडे, सतीश तिखोळे, संतोष खामकर, निवृत्ती शिंदे, विकास भनगडे, तुकाराम रोकडे, दादाभाऊ शिंदे, अविनाश रोकडे, दत्तात्रेय शिंदे, भाऊ शिंदे, दत्तात्रेय सरोदे, मंगेश रोकडे, अर्जुन रोकडे, शिवाजी मोहिते, भाउसाहेब शिंदे, नामदेव रोकडे, भाऊसाहेब दाते, रामचंद्र रोकडे, पंढरीनाथ व्यवहारे, शिवा भनगडे, दत्तात्रेय साळुंके, बाबासाहेब गांगड, रावसाहेब बर्वे यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

लाभ, अमिषापोटी पुढारी विरोधकाला मिळाले
बलाढय विरूध्द सर्वसामान्य अशी ही निवडणूक केवळ सर्वसामान्यांच्या जीवावर, त्यांच्या पाठींब्यावर आपण जिंकली. निवडणूक जाहिर झाल्यानंतर तालुक्यातील सर्वच पुढारी लाभापोटी तसेच अमिषापोटी विरोधकांना जाऊन मिळाले. मात्र सर्वसामान्यांच्या मतांच्या जोरावर आपण लोकसभेत पोहचलो आहोत.

तर लोकसभेचीच उमेदवारी दिली असती !
लोकसभा निवडणूकीत वडगाव सावताळने मोठे मताधिक्य दिल्याने स्थानिक वक्त्यांनी वडगांव सावताळ गावाला जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. दोन तीन नावांची शिफारसही करण्यात आली. हाच धागा पकडून दोन महिन्यांपूर्वी शिफारस केली असती तर लोकसभेची उमेदवारीच तुमच्या गावातून दिली असती अशी मिश्किल टीपन्नी खा. लंके यांनी यावेळी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe