Sarkari Yojana:- नुकताच काही दिवसा अगोदर राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला व यामध्ये अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या व यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थ्यांसाठी काही योजनांची घोषणा खूप महत्त्वपूर्ण ठरल्या. सध्या बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे हा राज्या पुढीलच नाही तर संपूर्ण भारतापुढील एक ज्वलंत प्रश्न आहे.
या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणण्यात आली आहे व या योजनेच्या माध्यमातून इयत्ता बारावी ते पदयुत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याचा अनुभव काळात शासनाकडून प्रत्येक महिन्याला विद्यावेतन दिले जाणार आहे.
इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार 6000 ते 10 हजार रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून प्रत्येक महिन्याला विद्यावेतन दिले जाणार आहे. मात्र याकरिता विद्यार्थ्यांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे आहे.
या योजनेमध्ये कमीत कमी वीस रोजगार देणाऱ्या उद्योगांना सहभागी होता येणार असून 2024 ते 25 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत राज्यातील सुमारे दहा लाख युवकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन मिळणार आहे.
विशेष म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बघितले तर आता पदवी- पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि अप्रेंटिस बंधनकारक असून त्यामुळे अशा प्रकारची ट्रेनिंग आणि अप्रेंटिस करणाऱ्या तरुणांना देखील विद्यावेतन या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्येक महिन्याला किती दिले जाईल विद्या वेतन?
1- या योजनेच्या माध्यमातून इयत्ता बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
2- आयटीआय तसेच पदवीका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
3- पदवीधर– पदव्युत्तर असलेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
कुठली पात्रता आवश्यक?
1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय किमान 18 ते 35 पर्यंत असावे.
2- शैक्षणिक पात्रता बारावी पास ते पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी.
3- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचे आधार नोंदणी झालेली असावी.
4- उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
साधारणपणे कसे आहे या योजनेचे स्वरूप?
1- ज्या उमेदवारांना अनुभव नाही अशा रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना मिळणार आस्थापना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण
2- 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी राहणार आहे.
3- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना त्यांची जी काही शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार शासन विद्या वेतन देणार आहे.
4- उमेदवारांना देण्यात येणारे विद्यावेतन हे ऑनलाईन हजेरीच्या आधारावर मिळणार असून ते थेट लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
5- जे विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण करतील त्यांना संबंधित संस्था म्हणजेच आस्थापनांकडून प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
6- महत्वाचे म्हणजे ही योजना गावपातळीवर पोहोचावी याकरता 50 हजार योजना दूत नेमले जाणार आहेत.