संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत शनिवारी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, कोकणात आणखी पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ, मराठवाड्यातही अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे कोकण तसेच घाटमाथ्यावर पाऊस पडत आहे. येत्या १४ ते १७ जुलैदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज व यलो अलर्ट आहे.
येथे काही भागांत अति जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. या भागात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. अशी आशंका हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी कोकण भागातील डहाणू येथे १२० मिमी इतका जोरदार पाऊस पडला. तसेच मुंबई येथे ४८, सांताक्रुझ ४८, रत्नागिरी येथे २९ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ४१, पुणे ५, नाशिक ५, सांगली २ तर सातारा येथे १ मिमी पाऊस पडला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे ०.४ मिमी पाऊस पडला, तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे २३ मिमी, गोंदिया ३६ तर बुलढाणा येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली.