अवघ्या एकाच वर्षांत १० कोटी रुपये गेले पाण्यात; ‘त्या’ रस्त्यावर खड्‌ड्यांचा ‘महापूर’

Published on -

Ahmednagar News :संगमनेर रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. डागडुजी सुरु असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरणार आहे. १० कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काही वर्षांपूर्वी एशियन विकास बँकेने (ए.डी.बी.) या रस्त्यासाठी १८९ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता; मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे तो निधी येऊ शकला नाही. वास्तविक हा रस्ता केंव्हाच चार पदरी होणे गरजेचे होते. कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मुंबई-नागपूर व नाशिक पुणे हे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत.

गतवर्षी झगडेफाटा ते वडगाव पान या मार्गावर जवळके पर्यंत रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे मोठे फलक लागले होते; मात्र रस्ता पुढे चालू आणि मागे नादुरुस्त होत होता.

कोपरगाव तालुक्यातील तळेगाव दिघेमार्गे संगमनेर रस्त्याची एक वर्षाच्या आत वाट लागली आहे. अधिकाऱ्यांनी दुसऱ्या थरात रस्त्याचे काम चांगले होईल, अशी केलेली बतावणी आता मोठी थाप ठरली असल्याचे उघड झाले आहे. पहिल्या पावसाच्या आत खड्‌ड्यांचा महापूर आलेल्या या रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे.

तळेगावमार्गे कोपरगाव- संगमनेर रस्त्याचा भाग असलेला झगडे फाटा- जवळके दरम्यान खराब रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून रस्त्याचे काम सुरू केले होते; मात्र रस्ता सुरू असतानाच मागे खराब होण्याचे काम वेगाने सुरू होते.

आता जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर रस्ता झगडे फाट्यापासून उखडला असून तो थेट जवळके पर्यंत. ठेकेदाराने तात्पुरती डागडुजी सुरू केली असली, तरी ती अल्पकाळ ठरणार आहे.

याच मार्गावर जवळके ते संगमनेर तालुका हद्दीतील रस्त्यासाठी काहीही आर्थिक तरतूद झाली नव्हती. खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकण्याचा प्रताप या विभागाने केला होता. तोही गायब झाला. आजही अंजनापूर शिवारात मोठ-मोठे खड्डे दिसून येत आहेत. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe