Ahmednagar News : अहिल्यानगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने आज रविवारी (दि.१४) पुकारलेल्या श्रीरामपूर बंद मध्ये व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी नागरीकांनी स्वयंस्पुर्तीने सहभागी होवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, नगरसेवक अशोक कानडे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आवाहन केले आहे.
याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले कि, श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही मागणी रास्त असून भौगोलिक दृष्ट्या श्रीरामपूर हे लगतच्या तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे जिल्ह्याचे मुख्यालय होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसेच श्रीरामपूर जिल्ह्याचे मुख्यालय हे उत्तरेतील सर्व तालुक्यांना कामकाजाच्या दृष्टीने सोयीचे असतानाही मागील ४० वर्षापासूनच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळे श्रीरामपूरसह उत्तरेतील तालुक्याच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी वेळोवेळी अधिवेशनात विषय उपस्थित करून श्रीरामपूर जिल्हाचे मुख्यालय व्हावे, हि मागणी लावून धरलेली आहे.
यापूर्वीही काँग्रेस पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन केलेले आहे. आमदार कानडे यांनी ६ तालुक्यासाठी नगररचना कार्यालय श्रीरामपूर शहरात मंजूर करून घेतले. शहराची हद्द वाढविण्यासाठी नगर पालिकेस शेती महामंडळाची जागा उपलब्ध आहे. श्रीरामपूर शहरात रेल्वे मार्ग, आर.टी.ओ. कार्यालय, एम.आय.डी.सी., शहरात प्रवेश करणारे रस्ते चौपदरीकरण, एम.आय.डी. सी. मध्ये हायपावर सबस्टेशन उभारणी, येथील ग्रामीण रूग्णालयाच्या दर्जात वाढ करून त्याचे रुपांतर उपजिल्हा रूग्णालयात केले.
अशा जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी आवश्यक त्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष गट- तटाचा विचार न करता, या पुढे सर्व आंदोलनात सहभागी असेल. सर्व व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक, नागरीकांनी स्वयंस्पुर्तीने उत्सपुर्तपणे श्रीरामपूर बंदमध्ये सहभागी व्हावे.
व श्रीरामपूर जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे, यासाठी बंद यशस्वी करावा. असे आवाहन श्रीरामपूर तालुका काँग्रेसपक्षाच्या वतीने सचिन गुजर, अरुण नाईक, अशोक कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे व पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.