Ahmednagar News : शेवगाव तालुक्याला शेअर मार्केटचा विळखामोठ्या प्रामाणात घट्ट विळखा पडला आहे कि काय असा प्रश्न पडत आहे. कारण शेअर मार्केटमध्ये जिल्ह्यातील सार्वधिक फसवणुकीच्या घटना शेवगाव तालुक्यातच घडल्या आहेत. या शेअर मार्केटच्या व्यसनामुळे या तालुक्यातील अनेकजण देशोधडीला लागले असून अनेकांचे संसार उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. मात्र तरीदेखील लोक शेअर मार्केटचा नाद सोडण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.
मागील दोन दिवसात शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्याच्या दोन घटना घडल्या असून याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिली फिर्याद कापड दुकानदाराने दिली आहे. त्याला शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देतो असे सांगून वीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

तर दुसरी फिर्याद शेतकऱ्याने दिली असून त्याला देखील २३ लाखांचा गंडा घातला आहे. कापड दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर मार्केट फसवणूकप्रकरणी हा दोन दिवसात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गणेश हनवते यांच्या कापड दुकानात जाऊन कमलेश सिसोदिया याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली आहे. चांगला नफा, परतावा मिळवून देईल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हनवते यांनी २ मे ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन, ‘फोन पे’ तसेच धनादेशाद्वारे वेळोवेळी १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
त्यानंतर नीलेश विजय सिसोदिया, संदेश विजय सिसोदिया यांनीही हनवते यांना आश्वासन देऊन आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या दोघांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडे काम करणारा गणेश मगर (रा. फलकेवाडी), बी. टी. राऊत यांच्याकडे धनादेशाद्वारे दिलेले, अशी एकूण २० लाख रुपयांची गुंतवणूक केली.दरम्यान, वेळोवेळी परताव्याची मागणी केली असता परतावा मिळत नसल्याने गुंतवणूक केलेल्या रकमेची मागणी केली.
त्यावेळी त्या तिघा भावंडांनी उडवाउडवीची उत्तरे देत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे हनवते यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यावरून कमलेश विजय सिसोदिया, नीलेश विजय सिसोदिया, संदेश विजय सिसोदिया (रा. आर्यन निवास, खंडोबानगर, शेवगाव) या तीन सख्ख्या भावंडांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शनिवारी सायंकाळी यशवंत साहेबराव पाटेकर (वय ४१, रा. ढोरजळगाव, ता. शेवगाव) या शेतकऱ्याने दुसरी फिर्याद दिली आहे. महेश दत्तात्रय हरवणे याने शेअर मार्केटमध्ये आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून २३ लाख ३९ हजार ९८० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार महेश दत्तात्रय हरवणे (रा. रेसिडेन्शिअल कॉलेजच्या पाठीमागे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.