विनाअनुदानीत शाळांना १०० टक्के अनुदान द्या; अन्यथा भंडारदऱ्यात जलसमाधी घेणार..!

Published on -

Ahmednagar News : महाराष्ट्रामध्ये २५ वर्षांपासून सहा हजार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाळा आहेत. त्यांच्या स्थापनेपासून राज्याला पाच मुख्यमंत्री, सहा शिक्षणमंत्री लाभले, तरी १०० टक्के अनुदान मिळाले नाही. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.

शासनाने पुढील टप्यात सर्व विनाअनुदानीत शाळांना १०० टक्के अनुदान दिले नाही, तर भंडारदरा येथे जलसमाधी घेण्याचा इशारा शिवाजी खुळे व राजेंद्र जाधव यांनी दिला आहे.

खुळे व जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, महाराष्ट्रामध्ये सहा हजार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आलेली होती. कायम शब्द काढून या सर्व शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे, यासाठी राज्यातील ६३ हजार शिक्षकांनी २५ वर्षांच्या कालावधीमध्ये जवळपास २०७ आंदोलने केली.

या आंदोलनाचे फलित म्हणून सरकारने २५ वर्षांमध्ये कायम शब्द काढून काही शाळा २० टक्के, काही शाळा ४० टक्के तर काही शाळा ६० टक्के अनुदानापर्यंत नेलेल्या आहेत. काही शाळांना अद्याप कोणत्याही स्वरूपाचे अनुदान दिलेले नाही.

वास्तविक १५ वर्षांपूर्वीच या सर्व शाळांना १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते; मात्र या शाळांना १०० टक्के अनुदानित करण्याबाबत शासन कमालीचे उदासीन असल्यामुळे २५ वर्षे हा प्रश्न रखडलेला आहे.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या प्रश्नात लक्ष घालून या सर्व शाळांना १ जानेवारी २०२४ पासून १०० टक्के अनुदान द्यावे, अन्यथा लवकरच शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डी ते भंडारदरा रंधा फॉल याठिकाणी पायी दिंडीने जाऊन जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवाजी खुळे, राजेंद्र जाधव, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन खैरे, स्वोंद्र गावडे, श्रीकृष्ण पवार, राजेंद्र नसते, दशरथ दिंधळे, बाबा साहेब दातीर आदी विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!