Indias Cheapest Car : भारतात फार पूर्वीपासून स्वस्त गाड्यांना अधिक मागणी राहिली आहे. त्यामुळे अनेक ऑटोमेकर कंपन्या स्वस्त कार बनवण्याला विशेष प्राधान्य दाखवतात. मध्यमवर्गीय लोकांमध्ये स्वस्त कारची मोठी मागणी असते. जेव्हाही स्वस्त कारचा विषय येतो तेव्हा आपल्या डोळ्यापुढे उभी राहते ती मारुतीची अल्टो ही कार. मात्र मारुती सुझुकीची अल्टो ही देशातील सर्वात स्वस्त कार नाही. मारुतीच्या अल्टो पेक्षाही एका कारची किंमत कमी आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे.
अल्टोची एक्स शोरूम किंमत ही 3.99 लाख रुपये एवढी आहे. मात्र, अशीही एक कार आहे ज्याची किंमत फक्त अन फक्त 3.61 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. बजाज Qute असे या कारचे नाव आहे. ही क्वाड्रिसायकल श्रेणीतील कार आहे. बजाजने 2018 मध्ये ही कार भारतीय बाजारात लॉन्च केली होती. मात्र ही कार आपल्या देशात सध्या फक्त व्यावसायिक कारणांसाठी युज होत आहे.
ही भारतातील पहिली ऑटो टॅक्सी बनली आहे. दरम्यान आज आपण भारतातील या सर्वाधिक स्वस्त कारची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर, ही गाडी 2018 मध्ये केवळ 2.48 लाख रुपयांच्या किंमतीसह लॉन्च केली गेली होती. गेल्या वर्षी या गाडीला NCAT ची मान्यता मिळाली आहे म्हणजे खाजगी/नॉन-ट्रान्सपोर्ट श्रेणीसाठी या गाडीला मंजुरी मिळाली.
अर्थातच आता ही गाडी खासगी कार म्हणूनही वापरता येणार आहे. मात्र, कंपनीने अद्याप त्याचे खासगी मॉडेल बाजारात लाँच केलेले नाही. मात्र या गाडी संदर्भात मीडिया रिपोर्ट मधून काही माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या गाडीत 4 ते 5 जण सहज बसू शकतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.
ही एक क्वाड्रिसायकल आहे, त्यामुळे तिचा टॉप स्पीड 70 किमी/ताशी एवढाच आहे. मात्र, कंपनीने त्याचे इंजिन अधिक शक्तिशाली बनवले आहे. याच्या पॉवरमध्ये 10.8 bhp वरून 12.8 bhp पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचे वजन देखील 17 किलोने वाढले आहे. बजाज Qute चे वजन 451 किलो, तर सीएनजी मॉडेलचे वजन 500 किलोपेक्षा जास्त होते.
आता खाजगी प्रकार मान्यतेमध्ये त्याचे कर्ब वजन 468 किलो झाले आहे. Bajaj Qute 4W मध्ये स्लाइडिंग विंडो आहेत. पण यात एसी मिळणार नाही. यात चालकासह 4 प्रवासी बसू शकतील. म्हणजे या गाडीमध्ये एकूण पाच प्रवासी बसू शकणार आहेत. त्याच्या पुढच्या भागात इंजिनऐवजी बूट स्पेस राहणार आहे. तर, इंजिन मागील बाजूस ऑटोप्रमाणे राहणार आहे.
Bajaj Qute 4W मध्ये 216cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे 10.8 bhp पॉवर आणि 16.1 Nm टॉर्क निर्माण करत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच पॉवर आता 2 bhp ने वाढून 12.8 bhp करण्यात आले आहे. पण, टॉर्क तसाच राहण्याची शक्यता आहे.
या इंजिनसोबत 5-स्पीड अनुक्रमिक गिअरबॉक्स आणि रिव्हर्स गियर जोडलेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, याच्या जुन्या मॉडेलचे मायलेज सुमारे 36km/l आहे. कारचा टॉप स्पीड 70 किमी प्रति तास असेल. याला इतर हॅचबॅक गाड्यांप्रमाणे चार दरवाजे राहणार आहेत.
नक्कीच देशातील या सर्वात स्वस्त कारचे प्रायव्हेट टाईप बाजारात दाखल झाल्यानंतर अनेकांना स्वस्तात स्वतःच्या कारचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. ही गाडी मध्यमवर्गीयांसाठी नक्कीच मोठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र या गाडीला ग्राहकांची पसंती मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.
कारण की, टाटा कंपनीने नॅनो बाजारात उतरवून असाच एक भन्नाट प्रयोग केला होता. मात्र नॅनो कारला ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दाखवला नाही. यामुळे बजाजच्या या गाडीला ग्राहक कसा प्रतिसाद दाखवणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.