Ahmednagar News : सोमवारी (दि. १५) अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर शहरासह कर्जत, जामखेड, पाथर्डी, घोडेगाव, नगर तालुका आदींसह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्या नाले भरून वाहू लागले तर अनेक ठिकाणी तलावही भरले.
रस्त्यांनाही ओढ्याचे स्वरूप आलेले पाहायला मिळाले. रविवारी (दि.१४), सोमवारी (दि.१५) जामखेड शहर, साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी या परिसरात दमदार पाऊस झाला.
लेंडी नदीला पूर आला. तालुक्यातील धोत्री व रत्नापूर तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले. फक्राबाद, पिंपरखेड, वंजारवाडी व चोंडी येथील कोल्हापूर बंधाऱ्यांत पाणी आले आहे. सोमवारी (दि.८) तालुक्यातील पाचपैकी चार मंडळात अतिवृष्टी झाली होती. यामुळे नदी, नाले, लहान बंधारे वाहते झाले.
जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वरदान ठरलेला भुतवडा तलाव ७० टक्के भरला आहे. भुतवडा तलावाच्या वरील बाजूस असलेल्या रामेश्वर येथील धबधबा वाहत आहे.
कर्जत शहरात आणि परिसरात तब्बल दीड तास तुफान पाऊस बरसत मुख्य रस्त्यास तलावाचे स्वरूप आले होते.
जवळपास सर्वच भागांत चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कर्जत शहर आणि परिसरात जोरदार पावसास सुरुवात झाली. पावसाने रौद्ररूप धारण करीत अक्षरशः नगर-बारामती मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप आणले.
अचानक आलेल्या पावसाने बाजारात आलेल्या महिलांचे हाल अनेक दुकानांत पाणी घुसले. मैदानी भागांत तलावासारखे पाणी साचले होते. सोमवारी (दि. १५) दुपारी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन तास झालेल्या या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
पाथर्डी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या गटारी तुंबल्या. तसेच कसबा विभागात असलेल्या अनेक घरांत पाणी घुसले. शहराच्या कसबा विभागात खोलेश्वर मंदिर ते दक्षिणमुखी मारुती मंदिर असा रस्ता करण्यात आला.
या रस्त्यावर एका ठिकाणी छोटा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाखाली असलेल्या नळ्या तुंबल्यामुळे या ठिकाणी पाणी साचले. हे पाणी या पुलालगत राहत असलेल्या पार्वती थोरात, गंगाराम थोरात यांच्यासह अनेकांच्या घरात शिरले.
नगर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. केडगाव, नगर शहर, सोनेवाडी, अरणगाव, चास आदींसह अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने ओढे नाले वाहते झाले होते.