बऱ्याचदा ग्रामीण भागात पैशांची निकड भासली तर शेतकरी किंवा सर्वसामान्य माणूस थेट सावकाराचा दरवाजाचा खटखटावतात. परंतु बऱ्याच लोकांना हे माहित नसते की सावकार हा देखील नोंदणीकृत असावा लागतो.
बऱ्याचदा हे सावकार हे अधिकृत नसतात व त्यांची टक्केवारी देखील प्रचंड असते अशी चर्चा आहे. आज या ठिकाणी आपण सावकार सावकार किती टक्के व्याज घेऊ शकतात? वस्तू, जमीन बळकावल्यास कुठे तक्रार करावी?याबाबत जाणून घेऊयात..
‘येथे’ करा तक्रार
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत अवैध सावकार किंवा नोंदणीकृत सावकार शेतकऱ्यांची जमीन बळकावत असल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव नसल्याने ते जमीन गमावून बसतात.
परंतु, शेतकऱ्यांनी वेळीच जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्यास सावकाराने बळकावलेली जमीन परत मिळू शकते. परवानाधारक सावकार जास्त व्याज घेत असतील तर अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा तालुका कार्यालयात तक्रारी केल्या जाऊ शकतात.
सावकार किती व्याज घेऊ शकतात?
परवानाधारक सावकारांनी व्याज घेण्यासंदर्भात वेगवेगळे निकष आहेत. शेतकऱ्यांकरिता तारण कर्ज ९ टक्के प्रतिवर्ष, विनातारण कर्ज १२ टक्के प्रतिवर्ष, शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिलेले तारण कर्ज १५ टक्के प्रतिवर्ष व विनातारण कर्ज १८ टक्के प्रतिवर्ष दराने दिले जाऊ शकते.
जिल्ह्यात १२२ नोंदणीकृत सावकार
ज्या कोणाला व्याजाने पैसे इतरांना द्यायचे असतील, त्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज करून सावकाराचा परवाना द्यावा लागतो. त्यानंतरच अधिकृत सावकार म्हणून ग्राह्य धरले जाते. येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत सावकारांची संख्या १२२ इतकी आहे.