रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, सरकारकडून सीना नदीवरील बंधाऱ्यांच्या कामासाठी ५० कोटी रुपयांची मंजुरी !

Ahmednagarlive24 office
Published:
rohit

मिरजगाव मतदारसंघातून वाहणाऱ्या सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे लातूर बॅरेज टाईपमध्ये रुपांतर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात सरकारकडे केली होती. त्यास अखेर मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सिना नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे एकूण १० बंधारे असून, त्यातील ६ बंधारे हे आष्टी विभागात येतात तर ४ बंधारे कर्जत जामखेड मतदारसंघात येतात. मतदारसंघातील निमगाव गांगर्डा, बेलगाव, घुमरी, रातंजन, नागलवाडी, नागापूर, सितपूर, तरडगाव, निंबोडी, मलठण, दिघी, निमगाव डाकु, चौंडी इत्यादी गावे शेतीसाठी बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

अतिवृष्टी झाल्यानंतर हे बंधारे दारे टाकूनही फुटून पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे हे बंधारे लातूर बॅरेज टाईपमध्ये करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आ. पवार यांच्याकडे केली होती.

आ. पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन बंधारे लातूर बॅरेज टाईपमध्ये करण्यासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, तसे निवेदन त्यांनी दिले होते.

आता आ. पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मार्च- एप्रिल २०२४ मध्ये बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन सदर कामासाठी ५० कोटींच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे घुमरी, रातंजण, नागलवाडी, नागापूर, सितपूर, तरडगाव या बंधाऱ्याचे कोल्हापूर बंधाऱ्यातून लातुर बॅरेज टाईपमध्ये रुपांतर होणार आहे.

तसेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकु, दिघी, चौंडी, या बंधाऱ्यांच्या सर्वेक्षण कामालाही मंजुरी मिळाली असून, विरोधकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ह्या कामाला अडथळा येत आहे. मात्र, हे ही काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे आ. पवार यांनी म्हटले आहे.

बंधारे भरल्यानंतर दारे काढणे व टाकण्याचा त्रास वाचेल, वेळेत दारे टाकल्याने बंधारे पूर्णक्षमतेने भरतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, शेतकऱ्यांनी आ. पवार यांचे आभार मानले आहेत.

महाविकास आघाडीच्या काळात सर्व्हेक्षणाच्या कामाला मंजुरी !
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंतराव पाटील साहेब यांनी बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाला मंजूरी दिली व हे काम पूर्ण झाले आणि या सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचेदेखील आभार. राहिलेल्या बंधाऱ्याच्या कामालाही सरकार लवकर मंजुरी देईल, ही अपेक्षा. असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe