Ahmednagar News : शहरातील सावेडी येथे महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी व ग्रंथालय उभारण्यासाठी महापालिकेची ४७ हजार चौरस फूट जागा नाममात्र दरात भाडेकराराने उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
याबाबत नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी महापालिका आयुक्तांना तसे पत्र दिले आहे. माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी या जागेत ग्रंथालयासाठी १५ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे.

सावेडी महापालिकेच्या येथील मालकीची ४७ हजार ४२५ चौरस फूट जागा महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी भाडे तत्वावर देण्यासाठी महापालिके ने ठराव केला होता. मात्र, नाममात्र दरात ही जागा द्यायची असल्याने महापालिकेने नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला होता.
या जागेत नागरिकांसाठी अद्ययावत ग थालय उभारण्यात येणार असून, त्याला निधीही मंजूर झालेला आहे. त्यामुळे माजी खासदार विखे व आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा केला होता.
त्यानंतर या प्रस्तावाला नगरविकास विभागाने नाममात्र एक रुपया दराने ३० वर्षांकरिता भाडेतत्त्वावर जागा देण्यास मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने मंजुरी देताना काही अटीही घातल्या आहेत. संबंधित जागा ज्या कारणासाठी दिली आहे, त्याच कारणासाठी वापरण्यात येईल याची दक्षता घ्यावी.
संबंधित जागा भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी रीतसर व आवश्यक अटींसह महापालिकेने करारनामा करावा. यासंदर्भात कोणतीही कायदेशीर अडचण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या आयुक्तांवर असेल, असे नगर विकास विभागाने स्पष्ट केले आहे.