जीवनामध्ये कोणती परिस्थिती कोणत्या वेळी निर्माण होईल याचा आपल्याला कुठलाच पद्धतीचा थांगपत्ता किंवा अंदाजा नसतो. बऱ्याचदा घरातील एखादा सदस्य किंवा स्वतः आपण एखाद्या आजाराने ग्रासले जातो व आजारी पडतो व मोठ्या प्रमाणावर दवाखान्यात खर्च करावा लागतो. तसेच घरातील मुलांचे उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क भरण्याची वेळ येते किंवा लग्नकार्य सारख्या कार्यक्रमांना अचानकपणे मोठा खर्च करावा लागतो. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर लग्नाला पुरेसा पैसा आपल्याकडे नसेल तर मात्र आपल्याकडे एक पर्याय उरतो व तो म्हणजे कर्ज घेणे हा होय.
कर्ज घेण्यासाठी आपण आपले मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून हातउसने किंवा कर्जरूपाने पैसे घेतो किंवा अडचणीच्या वेळी बँकांकडे जाऊन वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन साठी अर्ज करतो. या पर्सनल लोनच्या संदर्भात जर आपण पाहिले तर बँकांच्या माध्यमातून आपल्याला पर्सनल लोन दिले जाते. परंतु यामध्ये बँकांच्या अटी व शर्ती आपल्याला पूर्ण करणे गरजेचे असतात व तेव्हाच आपल्याला कर्ज मिळत असते. त्यामुळे बँकेत जाण्याच्या अगोदर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.

कर्जासाठी बँकेत अर्ज करा परंतु या गोष्टी अगोदर पहा
क्रेडिट स्कोर मेंटेन करा –
बँका किंवा कुठल्याही वित्तीय संस्थेकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लोन घ्यायचे असेल तर सगळ्यात अगोदर अशा बँका किंवा संस्थेकडून तुमचा क्रेडिट स्कोर पाहिला जातो. क्रेडिट स्कोर हा 300 आणि 900 या अंकांच्या दरम्यान मोजला जातो. यामध्ये 700 च्या पुढे जर तुमचा क्रेडिट स्कोर असेल तर तो एक चांगला क्रेडिट स्कोर समजला जातो व तुम्हाला बँक पटकन कर्ज देऊ शकते. परंतु या अंकाच्या खाली जर तुमचा क्रेडिट स्कोर असेल तर बँक तुम्हाला कर्ज नाकारू शकते व कर्ज दिले तरी जास्त व्याज त्यावर आकारते. जास्त व्याज आकारले म्हणजे ते फेडण्यासाठी तुम्हाला जास्त पैसा मोजावा लागतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच पर्सनल लोनसाठी अर्ज करणे फायद्याचे ठरते.
एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका –
आपल्यापैकी बरेच जण जेव्हा अचानकपणे पैशांची गरज निर्माण होते तेव्हा एकाच वेळी अनेक ठिकाणी म्हणजेच वेगवेगळ्या बँक अथवा वित्तीय संस्था इत्यादींकडे कर्जासाठी अर्ज करतात. असे केल्याने देखील बँकेच्या माध्यमातून तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो. कारण बँकांकडून तुम्ही लोन साठी कुठे अर्ज केला आहे का याची चौकशी केली जाऊ शकते आणि यासाठीच क्रेडिट ब्युरोच्या माध्यमातून तुमचा क्रेडिट रिपोर्ट देखील मागवू शकते. यामध्ये तुम्ही अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्या विश्वासाहर्तावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेताना एकाच कर्ज देणाऱ्या संस्थेकडून कर्ज घेणे योग्य ठरते. तुम्हाला जर कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही याआधी कुठे अर्ज केला नसल्याची खात्री करूनच अर्ज करा.
तुमचा उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे हे आधी बघा –
जेव्हा तुम्ही बँकेकडे कर्जासाठी अर्ज करता त्याआधी बँक तुम्ही ते परत करण्यासाठी सक्षम आहात की नाही याच्या अगोदर पाहणी करतात. त्यासाठी बँकेच्या माध्यमातून तुमचे उत्पन्न तपासले जाते. त्यामध्ये जर तुम्ही ईएमआय परत वेळेवर करू शकतात हे जर बँकेला दिसून आले तर बँक तुम्हाला पटकन कर्ज देते. तुमच्या उत्पन्नाच्या चौकशीमध्ये तुम्ही ईएमआय फेडण्यासाठी त्यांना सक्षम वाटले नाहीत तर ते अर्ज रिजेक्ट करू शकतात. या कारणामुळे जर तुम्हाला बँक रिजेक्ट करण्याची शक्यता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत बँकेच्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांना व्यवस्थित समजावून सांगू शकतात.
नोकरीला असाल तर सतत नोकरी बदलवू नका –
बऱ्याच लोकांना अशी सवय असते की सतत ते नोकरी बदलत असतात. परंतु ही सवय तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत कर्ज मिळवण्यामध्ये अडचणीची ठरू शकते. कारण वैयक्तिक कर्ज देण्याअगोदर बँक तुमची नोकरीची स्टेटस किंवा स्थिरता किती आहे हे अगोदर तपासात असते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. तुम्हाला नोकरी नसेल आणि तुम्ही कर्जासाठी अर्ज केला तर बँके तुमचा कर्जासाठीचा अर्ज शंभर टक्के रिजेक्ट करेन. कुठलीही बँक बेरोजगार लोकांना कर्ज देत नाही. कारण बँकेला ते जोखमीचे वाटते. याउलट तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल व तुम्हाला त्या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव असेल तर बँक तुम्हाला पटकन कर्ज देऊ शकते.