Ahmednagar News : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत. वळसे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्यास भविष्यात कुकडी कालवा बुजवला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या प्रश्नाबाबत श्रीगोंदे तालुक्याचे लोकप्रतिनिधी व दोन्ही कारखान्याचे अध्यक्ष जे कालवा सल्लागार समितीचे पदसिद्ध सदस्य असतात ते मूग गिळून गप्प का बसले आहेत.
त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहे. डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील. अशी भिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
पुढे बोलताना शेलार म्हणाले की, कुकडी होणारा प्रकल्पात डिंभे माणिकडोह बोगदा रद्द करावा अशी मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे. त्याचबरोबर ६५ बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून त्यासाठी २.५४ टीएमसी पाण्याची तरतूद करावी अशी मागणी केली आहे.
मुळात कुकडी प्रकल्पात असणाऱ्या बंधाऱ्याना पुरेसे पाणी मिळत नाही, मग आता नवीन ६५ बंधाऱ्याना मंजुरी देऊन आरक्षित पाणी केल्यास श्रीगोंदा तालुक्यासह पारनेर, कर्जत, करमाळा तालुक्यातील शेतीचे वाळवंट होईल.
याबाबत पदसिद्ध असणारे विद्यमान लोकप्रतिनिधी आणि दोन्ही सहकारी कारखान्याचे अध्यक्ष यांना पाणी प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने ते गप्प आहेत . कुकडीवर अवलंबून असणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी आता जागरूक होणे गरजेचे आहे.
डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बरबाद होणार असल्याने राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी केलेल्या मागणीला विरोध करत कूकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी लढा उभारावा लागणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
तसेच दिलीप वळसे पाटील मोठे नेते असून ते मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनासोबतच थेट सरकारवर दबाव आणावा लागेल. यासाठी आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मदत घेणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, संजय आनंदकर, अजीम जकाते, बाळासाहेब शेलार उपस्थित होते.