Ahmednagar News : अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा पाणलोटक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, ओढे-नाले खळखळून वाहू लागल्याने परिसरातील धबधबे कोसळत आहेत.सर्व परिसर निसर्गरम्य असून, डोंगरदऱ्यांनी हिरवा शालू परिधान केला आहे.
या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. दरम्यान भंडारदरा धरणात गेल्या २४ तासांत २४१ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. भंडारदरा धरण ४७ टक्के, तर निळवंडेचा पाणीसाठा २० टक्के झाला आहे.
आषाढी एकादशीनंतर भंडारदरा धरण पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, तीन- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात धुवाँधार पाऊस सुरू झाल्याने विकेंडला रतनगड, घाटघर, भंडारदरा धरण रिंगरोड परिसरात, तसेच हरिश्चंद्रगड, कोकणकडा, पाचनई, कुमशेत भागात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.
भंडारदरा धरण पाणलोट परिसरात आता जलोत्सव सुरू झाला आहे त्यामुळे या भागात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांनी धरण व परिसरातील उथळ वा खोल पाण्यात उतरू नये, सेल्फी घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदाचे सहायक अभियंता अभिजीत देशमुख यांनी केले आहे.
भंडारदरा पाणलोटात ४० किलोमीटरचा रिंगरोड आहे. रिंगरोड परिसरात वावडीच्या डोंगरावरून कोसळत थुईथुई नाचणारे चंदेरी प्रपात, कोलटेभेचा गायमुख, वसुंधरा, नेकलेस, न्हानी धबधबा, सांधनदरी जवळील गिरणाई (गिरणा नदी) उलटा आकाशाकडे झेपावणारा धबधबा, गडावरून कोसळणारे धबधबे, पांजरे येथील वैशाली धबधबा असे असंख्य चंदेरी प्रपात धबधबे पर्यटकांना सफरीसाठी खुणावत आहेत.
जलोत्सवाचा आनंद द्विगुणीत करताना पर्यटकांनी निसर्गास बाधा येईल, असे कृत्य करू नये. धोकादायक पॉईंटवर सेल्फी घेऊ नये. धबधबा व ओढ्यात पाण्यात उतरू नये. खडक निसरडे होतात. विषारी निशाचर गवत बिळातून बाहेर येतात. त्यामुळे काळजी घ्यावी. असे आवाहन वन्यजीव विभागाचे सहायक वनरक्षक पडवळ यांनी केले आहे.
तालुक्यातील मुळा खोऱ्यातील आंबीत, पिंपळगाव खांड, कोथळे, शिरपुंजे, बलठण, तर प्रवरा खोऱ्यातील वाकी, टिटवी व आढळा भागांतील पाडोशी हे लघु पाटबंधारे प्रकल्प भरून ओसंडून वाहत असून, सांगवी, घोटी-शिळवंडी, बोरी, बेलापूर बदगी, येसरठाव हे तलाव भरणे बाकी आहे.
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार १२२ दशलक्ष घनफूट म्हणजे ४७ टक्के इतका झाला आहे. निळवंडेत २० टक्के म्हणजे १ हजार ६५९ दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे. आढळा धरणाचा पाणीसाठा ४८ टक्के म्हणजे ५०७ दशलक्ष घनफूट झाला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने आदिवासी शेतकरी भातरोपे लागवडीच्या तयारीला लागले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.