राज्यात १२३ टक्के पाऊस, पेरण्या समाधानकारक, धरणांत ४० टक्के पाणीसाठा कृषी विभागाची राज्य मंत्रिमंडळाला माहिती

Published on -

राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून, पेरण्यादेखील समाधानकारक झाल्याची माहिती कृषी विभागाने सादरणीकरणाद्वारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मिलीमीटर (मिमी) पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या सुमारास ४२२ मिमी म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरिपाचे ऊस पीक वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १२८. ९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी झाली आहे.

भात व नाचणी पिकांची पुर्नलागवड कामे सुरू असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता असल्याचे कृषी विभागाने मंत्रिमंडळासमोर सांगितले.

राज्यातील धरणांत ४० टक्के पाणीसाठा

सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी या सुमारास ४३.६५ टक्के पाणीसाठा होता. सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच २८.३४ टक्के नाशिक येथे आहे. मान्सून सुरू झाला असला, तरी राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांना १ हजार ३६५ टँकर्सद्वारे सध्या पाणी पुरवठा सुरू असून, टँकर्सची संख्या ३२६ ने वाढली आहे, असेही मंत्रिमंडळासमोर सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News