बिबट्याचा या ठिकाणी धमाकूळ : महिलांसमोर बिबट्याने झडप घातली अन… ?

Published on -

Ahmednagar News : सध्या अनेक भागात बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे. भरवस्तीत घुसून नागरिकांवर देखील हल्ले गॉट असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन वावरत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव येथे बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे. पाळीव कुत्रे उचलून नेण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला. महिलांसमोर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले असता, पुरावा नसल्याने पंचनामा होणार नसल्याचे सांगितले. वनविभागाने या ठिकाणी भेट देखील दिली नाही. वडाळामहादेव येथील इरिगेशन कॉलनी भागात सागर जगताप यांचे राहते घर व गुरांचा गोठा आहे.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान बिबट्याने घराच्या बाजूला बांधलेल्या एका शेळीवर हल्ला केला. यामध्ये शेळीचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार मंगल जगताप व मेघा जगताप यांच्यासमोर झाला. त्यांनी आरडाओरडा केल्याने हा बिबट्या शेजारील झुडूपात जाऊन या महिलांवर जोरजोरात गुरकू लागला. त्यामुळे या महिला भयभीत होत घराकडे आल्या.

काही वेळाने सागर जगताप यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता, मृत झालेली शेळी बिबट्याने उसाच्या शेतात नेत तिचा फडशा पाडला असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील आठवड्यात याच परिसरात सरपंच अविनाश पवार यांच्या गोठ्यातून बिबट्याने पाळीव कुत्रे उचलून नेले होते.

सध्या शेतात खरिपाची पिके आहेत, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे कशी करावी ? असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. घटना घडूनही वनविभाग पाहणीसाठी येत नसल्याने या ढिसाळ कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

याठिकाणी पिंजरा बसवण्याची मागणी वनविभागाकडे अनेकदा करूनही त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. आता तरी वनविभागाने याठिकाणी पिंजरा बसवावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe