Ahmednagar News : अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला व इतर धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदीतील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असल्याने
कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील वरील भागात अतिवृष्टी झाली आहे. खडकवासला आणि इतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यामुळे भीमा नदीला पूर आला असून कर्जत, श्रीगोंदा तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.२५) तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे व भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी बोटीद्वारे श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी,
अनगर बेटाची पाहणी केली. तेथील नागरिकांसाठी औषधे पोहोच केली. कर्जत तालुक्यातील भीमा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार, प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिली. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे भीमा नदीचे पाणी पाहण्यासाठी पुलावर गर्दी होती.
दरम्यान आता श्रीगोंदा, कर्जत, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
सखल भागातील नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदी, ओढे व नाल्यांपासून दुर रहावे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्याास गर्दी करु नये. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रात पर्यटनास जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. प्रवाहामध्ये उतरू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.