लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला : पाच मुले जखमी, ‘या’ ठिकाणी घडली धक्कादायक घटना

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकणी सखल भागात पावसाचे पाणी साचून राहते त्यामुळे पाण्यात डास व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. नगर शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे रुग्ण आढळून येत आहेत.
गाव संकट कमी होत नाही तोच शहरासह उपनगरात मोकाट कुत्रे व जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

अनेकदा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांसह महिलांना ही जनावरे आडवी येतात. धक्का देतात वळूच्या झुंजीने अनेकदा धावपळ उडते. मोकाट कुत्रे गल्लोगल्ली व उपनगरात खुलेआम फिरतात. संख्या वाढल्याने त्यांचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. शहरात सध्या मोकाट जनावरे व कुत्र्यांमुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकाराने मोकाट कुत्र्यांची शहरात दहशत निर्माण झाल्याचे वास्तव दिसत आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना उपद्रव निर्माण करणारी कुत्र्यांची मोकाट फिरणारी टोळी आता लहान बालकांना लक्ष्य बनवित आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

नुकतेच संगमनेर शहरात रात्री मोगलपुरा परिसरात रात्री खेळणाऱ्या तब्बल पाच लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी या मुलांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. अब्दुल कवी तबरेज, ईनाया हिम्मत कुरेशी, मारिया सलीम शेख अशी तीन जखमी मुलांची नावे समोर आली, मात्र अन्य जखमी मुलांचे नावे समजू शकले नाहीत.

कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मुले भयभीत झाली. त्यांनी आरडाओरड केल्याने पालकांनी त्यांची कुत्र्यांपासून सुटका केली. जखमी बालकांवर तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. काही बालकांचे हात- पायासह पाठीवर कुत्र्यांनी चावा घेतला.

नगर शहरात देखील अशा मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा मोकाट कुत्र्यांचा मनपाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe