देशात डोके आणि गळ्याच्या कर्करोगाचा विळखा विशेषतः युवकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सद्यःस्थितीत जवळपास २६ टक्के कर्करोगाचे रुग्ण हे डोके आणि गळ्याच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत, अशी चिंताजनक माहिती एका नवीन अभ्यासातून समोर आली आहे.
यावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था प्रभावी करण्याची आणि तंबाखूमुक्त अशा आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक डोके आणि गळा कर्करोग दिनानिमित्त शनिवारी दिल्लीस्थित कर्करोग मुक्ती भारत फाऊंडेशन नामक एका स्वयंसेवी संस्थेने यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे. यात देशात वाढत चाललेल्या डोके आणि गळ्याच्या कर्करोगावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
देशभरातील १८६९ कर्करोग पीडितांवर आधारित या अभ्यासानुसार जवळपास २६ टक्के रुग्ण हे डोके आणि गळ्याच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. देशात डोके व गळ्याच्या कर्करोग रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेषकरून तरुण पुरुषांमध्ये हा आजार वाढत चालला आहे. तंबाखूचे सेवन आणि मानव पैपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे याचा विळखा वाढत चालला आहे.
जवळपास ८० ते ९० टक्के तोंडच्या कर्करोगाचे रुग्ण कोणत्या तरी पद्धतीने तंबाखूचे सेवन करत असल्याचे आढळल्याचे कर्करोगमुक्त भारत अभियानाचे प्रमुख वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ आशिष गुप्ता यांनी सांगितले. अन्य कर्करोगाच्या तुलनेत डोके आणि गळ्याशी संबंधित बहुतांश कर्करोग हे रोखले जाऊ शकतात.
आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करत या आजाराला रोखले जाऊ शकते. तसेच तंबाखू सोडण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्याची आणि आजाराचा लवकरच वेध घेण्यासाठी प्रारंभिक तपासणीवर भर देण्याची आवश्यकता गुप्ता यांनी व्यक्त केली.
देशात कर्करोगाचे जवळपास दोन तृतीयांश प्रकरणे हे उशिरा लक्षात येतात. प्रामुख्याने योग्य वेळी तपासणी न केल्यामुळे असे होते. त्यामुळे कर्करोगावर मात मिळविण्यासाठी प्रारंभिक तपासणीवर भर देण्याची देखील गरज असल्याचे गुप्ता म्हणाले.
पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास डोके व गळ्याच्या कर्करोगाचे सुमारे ८० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. कर्करोगाच्या उपचारात जवळपास प्रत्येक आठवड्यात नवीन औषधांची भर पडत आहे. त्यामुळे वेळेवर निदान झाल्यास प्रभावी उपचार शक्य असल्याचे गुप्ता यांनी म्हटले. नुकताच जारी झालेल्या ग्लोबोकॅनच्या ताज्या डेटानुसार भारतात २०४० सालापर्यंत २१ लाख नव्या कर्करोग रुग्णांची भर पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.