मशीनवर अंगठा लावूनही धान्य मिळेना; सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने धान्य वितरण व्यवस्था कोलमडली

Published on -

Ahmednagar News : सध्या दरमहा मिळणारे रेशन देखील जर तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन केले असेल तरच मिळते. ते देखील ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर संबंधित रेशनकार्डधारकास धान्य दिले जाते.

परंतु सध्या स्वस्त धान्य दुकानांमधील ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने जिल्ह्यातील धान्याचे वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे या दुकानांमधून धान्य न घेताच रिकाम्या हाताने रेशनकार्डधारांना परतावे लागत आहे.

दरम्यान जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनमधील तांत्रिक बिघाड होत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील माहिती मागवली होती. ई-पॉस मशीनच्या सर्व्हरमधील तांत्रिक दोष शोधण्याचे काम मुंबईतून सुरू आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे दरमहा पात्र रेशनकार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात येते. मुंबईवरूनच सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील सर्वच ठिकाणी वितरण व्यवस्था कोलमडली आहे. मागील पंधरा दिवसांपासून धान्य वितरणात अडचणी येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात १,८८७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत ७ लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये २९ लाखांपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थ्यास धान्याचा लाभ मिळतो. परंतु मागील पाच दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे वितरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

राज्य सरकारने गौरी-गणपती उत्सवानिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात २९ लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वाटप करून आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आव्हान दुकानदारांपुढे असणार आहे. सध्या या ई-पॉस मशीनच्या सर्व्हरमधील तांत्रिक दोष शोधण्याचे काम मुंबईतून सुरू आहे. तो दोष दुरुस्त झाल्यानंतर रेशनकार्डधारक लाभार्थ्यास धान्याचा लाभ मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe