पिकअप आणि आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू , ‘या’ ठिकणी घडली दुर्घटना

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर-सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपासजवळ पंचर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप आणि आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअपचा चालक ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मयूर भगवान मोरे (रा. जामखेड) हा त्याच्या ताब्यातील पिकअप (क्र. एमएच १६ सीडी ५४३१ ) हा नगरकडून मिरजगावच्या दिशेने घेऊन जात होता.

तो नगर-सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपासजवळ आला असता पिकअपचे टायर पंचर झाल्याने त्याने पिकअप महामार्गाच्या बाजूला थांबवला व त्यानंतर पंचर झालेले टायर काढण्यासाठी तो पिकअपच्या समोरच्या बाजुला गेला व चाक काढत होता.

दरम्यान याचवेळी नगरकडून मिरजगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच १८ बीजी १३८०) ने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली.

यावेळी पिकअपचे पंचर काढणारा मयूर भगवान मोरे जागीच ठार झाला. तसेच या अपघातानंतर आयशर टेम्पो देखील रस्त्याच्या खाली जाऊन पडला.

या घटनेची माहिती समजताच मिरजगाव येथील सोनू बागवान, तसेच जीवन ज्योती रुग्णवाहिकेचे लहू बावडकर तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी मोरे यास मिरजगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये आणले व मिरजगाव पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नगर शहरातील चांदणी चौकातील वळणावर उड्डाण पुलावरून पुणेकडे जाणारा एक आयशर टेम्पो खाली पडल्याची घटना घडली होती.

या घटनेतदेखील एकजण मृत झाला होता. सध्या जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची सुधारणा केली आहे, त्यामुळे या रस्त्यावरून अत्यंत सुसाट वेगाने वाहने धावत आहेत. मात्र यावेळी वाहतुकीच्या नियमाचे देखील पालन करणे गरजेचे आहे. जेणेकरून विनाकारण नागरिकांचे बळी जाणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe