Sujay Vikhe Patil : सुजय विखेंची विधानसभेची तयारी; महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ

सोडतील ते विखे कसले... सुजय दादांची विधानसभेची तयारी विरोधात कोण थोरात की तनपुरे...?

Sujay Vikhe Patil : राहुरी विधानसभेसाठी यावेळी विखे कुटुंबातला सदस्य दिसेल, अशी शक्यता अहमदनगर लाईव्ह 24 ने महिन्यापूर्वीच वर्तवली होता. लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंचा मूड बदलला होता. आत्मपरिक्षण करुन त्यांनी आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य राहुरीतून लढेल, असा अंदाज आम्ही मांडला होता. आज असंच काहीतरी होण्याचं दिसलं… संगमनेर किंवा राहुरी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा आहे, व ती आपण पक्षाकडे बोलून दाखविली आहे, असं सुजय विखेंनी आज पत्रकारांना सांगितलं. विखेंच्या या निर्णयानंतर मात्र नगरच्या मविआच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली.

आपण येत्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर किंवा राहुरीतून लढण्यास तयार आहोत. पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली असल्याचे आज सुजय विखेंना पत्रकार परिषदेत सांगितले. सुजय विखेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी नक्कीच वाढली असणार. कारण विखेंचा हा निर्णय मविआच्या नेत्यांसाठी अगदीच अनपेक्षित होता. लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखे पूर्णपणे बदलले आहेत. सुजय विखे जरा आक्रमक मूडमध्ये दिसायला सुरुवात झालीय. नगरमध्ये झालेल्या आत्मचिंतन मेळाव्यातही विखेंनी स्वतः बदलल्याचे सांगितले होते. शिवाय त्याच मेळाव्यात त्यांनी आपला मोबाईल नंबर जाहीर करुन, आपल्याशी थेट बोला, असंही सांगितलं होतं.

विखे-थोरात हे दोन्ही नेते पूर्वीपासून सुसंस्कृत राजकारण करताना दिसले आहेत. विखेंनी संगमनेरमध्ये, किंवा थोरातांनी शिर्डीमध्ये दखल दिलेली कधीही दिसली नव्हती. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना एकमेकांच्या कार्यक्षेत्रात दखल द्यायची नाही, हा अलिखित मंत्र कायम जपला गेलेला दिसला. मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये जास्त बिनसलं. थोरातांनी शिर्डीत लक्ष घालायला सुरुवात केली. अगोदर कोल्हेंना सोबत घेऊन गणेश कारखाना व नंतर विखेंच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीत थोरातांनी सत्तांतर घडवलं. शिवाय लोकसभेलाही आपली स्वतंत्र यंत्रणा वापरून निलेश लंकेंना विजयी केलं. आपल्या मतदारसंघातील थोरातांची वाढलेली उठबस विखेंना आवडलेली नाही. त्यातच लोकसभेला झालेला पराभवही विखेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसलंय. त्यामुळेच थोरातांना थेट त्यांच्याच मतदारसंघात चॅलेंज देण्याची भूमिका विखेंनी घेतल्याचे दिसतेय. विखेंच्या या निर्णयामुळे मात्र नगरच्या राजकारणात थोरात-विखे हा संघर्ष नक्कीच वाढणार आहे.

आमदार प्राजक्त तनपुरेंच्या बाबतीतही तसंच… लोकसभेच्या निवडणुकीत राहुरी मतदारसंघाने सुजय विखेंना लीड दिलं. मात्र यावेळी गेल्यावेळीपेक्षा निम्याने ते कमी झालं. लीड घटण्यास प्राजक्त तनपुरे हेच कारणीभूत आहेत, हे लपलेलं नाही. निलेश लंकेसाठी प्राजक्त तनपुरेंनी स्वतः पुढाकार घेत, राहुरीतील प्रचाराची धुरा सांभाळली होती. हे शल्य सुजय विखेंच्या मनात आहेच. प्राजक्त तनपुरेंचा लोकसभेचा हिशोब चुकता करायचा, तर त्यांच्याविरोधात थेट विधानसभेच्या रिंगणाताच उतरायचे, असा सुजय विखेंचा कयास दिसतोय. सुजय विखे राहुरीतून लढले तर, प्राजक्त तनपुरेंना निवडणूक नक्कीच सोप्पी राहणार नाही. विखेंचं राहुरीत गेल्या दहा वर्षांपासून संघटन आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या शक्यताही जास्त आहेत.

आता ही झाली, सुजय विखेंना संगमनेर व राहुरीतून का लढायचंय, याची कारणे… पण विखेंच्या या गर्जनेला दुसरी बाजूही आहे. लोकसभेनंतर महाविकास आघाडीचं बळ वाढलंय. विखेंना नगर भाजपमध्ये आपलं एकहाती वर्चस्व कायम ठेवायचं असलं, तर येणाऱ्या विधानसभेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा महायुतीला जिंकून द्याव्या लागणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काँन्फीडन्स सध्या ‘सातवे आसमान पर’ आहे… तो जागेवर आणायचा असेल तर सुजय विखेंना अशी गर्जना करावीच लागणार आहे. विखेंच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर मविआच्या नेत्यांचं टेन्शन नक्कीच वाढलं असणार. महायुतीला हेच पाहिजे होतं… त्यामुळे विखे खरच राहुरी किंवा संगमनेरातून लढतील का, हे पहावं लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe