Ahmednagar News : नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जापोटी बँकेच्या अवसायकाणे शेवगावमध्ये एकाची मालमत्ता ताब्यात घेऊन तिला कुलूप लावले होते. मात्र संबंधित कर्जदाराने मी आणि माझ्या मुलाने कुलूप तोडले असून, तुम्हाला काय करायचे आहे ते करा. अशी अरेरावी करत ते कुलूप तोडले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेमध्ये सन २०१४ ते २०१९ या कालावधीत गैरव्यवहार व अपहार केला, तसेच संगनमताने बनावट मूल्यांकन करून ठेवीदार, खातेदार, सभासद यांचे नुकसान केले, या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू असून या संपूर्ण घोटाळ्याचे पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे. यात प्रथमदर्शनी १०५ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यात सुमारे २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
फॉरेन्सिक अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासणीत शेवगाव तालुक्यामध्ये बँकेच्या शाखांमधून सुमारे ३०० हून अधिक पिशव्यांमध्ये बोगस सोने निघाले आहे. त्याची स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याची चौकशी करून अहवाल तयार करण्यात आला आहे.
दरम्यान थकीत कर्जापोटी नगर अर्बन बँकेने शेवगावमध्ये एकाची मालमत्ता ताब्यात घेऊन तिला लावलेले कुलूप संबंधित कर्जदाराने तोडले. याप्रकरणी पोलिसांत जगन्नाथ सूर्यभान ढाकणे व रावसाहेब विश्वनाथ ढाकणे (दोघे रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मी आणि माझ्या मुलाने कुलूप तोडले असून, तुम्हाला काय करायचे आहे ते करा, असे भाष्य संबंधित कर्जदाराने केले असून, वसुली पथकाला भेटण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जाची वसुली बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी सुरू केली असून, यासाठी बँक कर्मचाऱ्यांची पथके नेमली आहेत. यातील गोकुळ ठोंबरे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ते सध्या राहुरी तालुक्यातील टाकळीमानूरला नगर अर्बन बँकेत काम करतात. या घटनेची माहिती अशी,
जगन्नाथ सूर्यभान ढाकणे यांना २००९ साली नगर अर्बन बँकेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज देण्यात आलेले होते. त्यासाठी रावसाहेब ढाकणे यांच्यासह माणिक बटुळे व सुरेशा देशमुख हे जामीनदार होते. कर्जाची वेळेत परतफेड केली नाही म्हणून ढाकणे यांची संपत्ती २३ जुलैला ताब्यात घेऊन तिला सील लावण्यात आले.
मात्र, ३१ जुलै रोजी सकाळी बैंक अधिकारी तिथे पोहोचले त्यावेळी सील तोडल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधित थकबाकीदारांशी संपर्क साधल्यावर त्याने कुलूप तोडल्याचे मान्य करून अरेरावीची भाषा केली व भेटण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.