Ahmednagar News : भंडारदरा पाणलोट क्षेत्राला शनिवारी रात्री अतिवृष्टीने झोडपले. घाटघर येथे मागील १८ वर्षांनंतर सर्वाधिक १९ इंच पाऊस कोसळला. रतनवाडी, पांजरे, भंडारदरा येथेही विक्रमी पावसाची नोंद झाली.
भंडारदरा धरणातून रविवारी सर्वाधिक २८ हजार २४४ तर निळवंडे धरणातून सायंकाळी सहा वाजता ३० हजार ७७५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत सरासरी ३४३.५ मिलीमीटर ( ७६.६६ टक्के) पाऊस झाला असून,
शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात, तसेच भंडारदरा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या नद्यांच्या व धरणांच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, मुळा, आदी नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
त्यामुळे या नदीकाठावरील रहिवाशांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
शनिवारी दिवस रात्र मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्राला धुवाधार पावसाने झोडपून काढले. या चोवीस तासांत घाटघर येथे ४७५ मिमी पाऊस कोसळला तर रतनवाडी येथे ४४९ , पांजरे ४४५ आणि भंडारदरा येथे २४५ मिमी पाऊस पडला. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. अति मुसळधार पावसामुळे दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जनजीवन ठप्प झाले आहे.
अतिसतर्कतेचा इशारा कोणाला
श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदाकाठावरील नागरिकांना, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा प्रवराकाठच्या नागरिकांना, पारनेर तालुक्यातील कुकडी नदीकाठावरील नागरिकांना, श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीकाठावरील नागरिकांना.
रविवारचा विसर्ग (दुपारी १२)
■ गोदावरीत नांदूरमध्यमेश्वर येथून ४४७६८ क्यूसेक
■ भीमा नदीत दौंड पूल येथून ७४४५६ क्यूसेक
■ प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २७११४ क्यूसेक
■ प्रवरा नदीत निळवंडे धरणातून २१८५५ क्यूसेक
■ प्रवरा नदीत ओझर बंधारा येथून १३९२ क्यूसेक
■ मुळा नदीत कोतूळ येथून ४१६०० क्यूसेक
■ कुकडी नदीत येडगाव धरणातून ७५०० क्यूसेक
■ घोड नदीत घोड धरणात १०००० क्यूसेक