निवडणुका जवळ आल्याने अनेक नवनवीन घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र, जुन्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. घरकुल योजने अंतर्गत मिळणारे अनुदान रखडल्याने सरू झालेल्या घरांची कामे रखडली असून अनुदान कधी येणार आणि कधी कामे होणार याबाबत लाभार्थी चिंतेत आहेत.
ग्रामीण भागात विविध घरकुल योजनेसाठी शासनाकडून टप्याटप्याने १ लाख २० हजार रुपये व रोजगार हमी योजने अंतर्गत २० हजार असे १ लाख ४० हजार रुपये अनुदान देण्यात येते. घरकूल बांधकामासाठी ५ ब्रास वाळूही मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्यात ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुमारे ९३९, रमाई आवास यजने अंतर्गत ७१, शबरी आवास योजनेअंतर्गत २१, तर मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत ३५० घरकुल मंजूर आहेत.
मंजुरीनंतर लाभार्थ्यांनी त्यांचे कामेही सुरू केले आहेत. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षाता पाहणी पण केलेली आहे. सुमारे १२ हजार कोटी रुपयांची मोदी आवास योजना २०२३-२४ यावर्षी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या योजे अंतर्गत इतर मागसवर्गीयांसाठी घरकुलांचे लाभ मिळतात.
३ वर्षांत १० लाख घरे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून २०२३-२४ मध्ये ३ लाख घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत श्रीरामपूर तालुक्यात सुमारे ३५० घरकुल मंजूर करण्यात आले.