इतिहासात पहिल्यांदाच श्रीगोंद्यात महिला आमदाराला संधी मिळणार, अशी शक्यता अहमदनगर लाईव्ह 24 ने दोन महिन्यांपूर्वीच व्यक्त केली होती. आताचे इच्छुक पाहता, श्रीगोंद्यात महिला आमदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातही तब्बल अर्धा डझन इच्छुकांमुळे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसारखीच यंदाची निवडणूक होते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. श्रीगोंदा तालुक्यात सात गट व 14 गण आहेत. प्रत्येक गटात वेगवेगळा नेता आहे.या नेत्यांच्याभोवतीच ही निवडणूक फिरणार असल्याने रंगत वाढली आहे. तब्बल पाच जण बंडखोरी करुन अपक्ष उभे राहतील, असे गणित राजकीय विश्लेषक मांडत आहेत. शिवाजी कर्डिले उभे राहतील का, नागवडेंचे काय होणार, राहुल जगताप-घनश्याम शेलार माघार घेतील का, आमदार बबनराव पाचपुते- साजन पाचपुते- सुवर्णा पाचपुते हे तिन्ही पाचपुते काय करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

मित्रांनो, पहिल्यांदा आपण श्रीगोंदा तालुक्यात काय स्थिती आहे ते पाहू…
श्रीगोंदा तालुक्यात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत. पाचपुते हे गेल्या 35-40 वर्षांपासून तालुक्यावर होल्ड ठेऊन आहेत. याशिवाय सगळ्या पक्षातून त्यांनी आमदारकी भोगली आहे. म्हणजेच येथे पक्ष कोणता आहे यापेक्षा पाचपुते यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान होतं, असं म्हटलं जातं. पाचपुते यांच्याविरोधात सगळ्यात आधी नागवडे कुटुंब विधानसभेला दोन हात करत होतं. त्यानंतर राहुल जगताप व गेल्यावेळी घनश्याम शेलार यांनी पाचपुतेंसोबत लढत दिली.
विरोधात कुणीही असले तरी, पाचपुतेंनी कुणाला फारसं जमून दिलं नाही. याच जोरावर त्यांनी मंत्रीपदंही भोगली. गेली तीन-चार दशके श्रीगोंद्यात पाचपुते एके पाचपुते, अशीच स्थिती राहिली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पाचपुते हे आजारी असल्यामुळे सध्या राजकारणाला जास्त वेळ देऊ शकत नाहीत. यावेळी भाजप त्यांच तिकीटही बदलण्याची शक्यता आहे. हिच संधी साधून, यावेळी तब्बल सात नेते विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची डरकाळी फोडत आहेत.
आता आपण तालुक्यातील इच्छुकांवर एक नजर मारू…
पातपुतेंविरोधात विधानसभेसाठी इच्छुकांच्या यादीत पहिलं नाव येते अनुराधा नागवडे यांचं. लोकसभेपूर्वी नागवडे कुटुंबाने काँग्रेस बायबाय करुन अजितदादांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळीच त्यांनी अजितदादांकडून विधानसभेचा शब्द घेतल्याचे बोलले जातेय. दुसरं नाव येतं, ते राहुल जगतापांचं. पाचपुतेंना एकास एक फाईट द्यायची, म्हणून गेल्यावेळी राहुल जगतापांनी माघार घेतली होती. यावेळी ते लढण्याच्या मूडमध्ये आहेत. शरद पवार गटाकडून आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
इच्छुकांत तिसरं नाव येत, ठाकरे गटात गेलेल्या साजन पाचपुते यांचं… साजन यांनाही खा. संजय राऊत यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. तालुक्यात पाचवे इच्छुक आहेत, गेल्यावेळी पाचपुतेंकडून फक्त साडेचार हजारांनी पराभूत झालेले घनश्याम शेलार. शेलार सध्या काँग्रेसमध्ये आहेत. मात्र काँग्रेसमध्ये जाताना त्यांनाही नाना पटोले यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. म्हणजेत श्रीगोंद्यात प्रत्येक पक्षाचा तगडा नेता, विधानसभेसाठी इच्छुक आहे.
आता श्रीगोंदा तालुक्यात रंगत आलीय, ती दुसऱ्या फळीतील इच्छुकांमुळे…
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णा शेलार यांनीही काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुक लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी आपल्या मुलाला बेलवंडीचा सरपंच ऋषिकेश शेलार याला सोबत घेत तालुक्यात बैठकाही सुरु केल्या. ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून किंवा थेट अपक्ष लढण्याचीही त्यांची तयारी आहे. शेलारांशिवाय भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनीही सोमवारी निवडणुक लढविण्याचे पत्रकार परिषदेत सांगून टाकले. पक्षाने सांगितल्यामुळे आपण गेल्यावेळी शांत राहिलो, मात्र यावेळी आखाड्यात उतरायचेच असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.
पाचपुतेंऐवजी भाजप नवा चेहरा देण्याची शक्यता आहे. पाचपुते हे आजारी असल्यामुळे, त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्या नावाची चर्चा आहे. ही चर्चा पाहिल्यानंतर आता भाजपकडूनच सुवर्णा पाचपुते यांनीही दंड थोपटलेत. त्यापूर्वी अनुराधा नागवडे यांनीही प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केलाय. एवढ्या सगळ्या महिला उभ्या राहणार असतील, तर सहाजिकच राहुल जगताप हेही आपल्या पत्नी डाँ. प्रणोती जगतापांना पुढे करु शकतात. म्हणजेच श्रीगोंद्यात पहिल्यांदा महिला आमदार होण्याची शक्यता वाढते.
बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, राहुल जगताप, प्रणोती जगताप, अनुराधा नागवडे, साजन पाचपुते, आण्णासाहेब शेलार, धनश्याम शेलार, सुवर्णा पाचपुते या नऊ जणांखेरीज शिवाजी कर्डिले यांचेही नाव श्रीगोंदा मतदारसंघात येते. म्हणजेच सात जिल्हा परिषद गट असलेल्या श्रीगोंद्यात विक्रमी 10 उमेदवार निवडणुकीच्या तयारीत आहेत. या दहा जणांपैकी कोण आणदार होईल, असे तुम्हाला वाटते… तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.