अहमदनगरमध्ये शिक्षकांची भरती सुरू ! पवित्र पोर्टलद्वारे किती जागा भरणार? मुलाखती किती तारखेपर्यंत?पहा सविस्तर

शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भावी गुरुजींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया सुरू केली असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून तातडीने रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
teacher

Ahmednagar News :  शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भावी गुरुजींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया सुरू केली असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून तातडीने रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात विविध शिक्षण संस्थांमध्ये दीड हजार शिक्षकांची पदे रिक्त असून त्यापैकी ५७८ पदे भरली जाणार आहेत. जिल्ह्यातील ४९९ शिक्षण संस्थांनी पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे.

८० शिक्षण संस्थांनी भरतीची मागणी केली असून ५७८ शिक्षणसेवक पदांसाठी भरती त्या संस्थांमध्ये होत आहे. प्रत्येकी एका पदासाठी १० उमेदवारांची नावे शिक्षण संस्थांकडे पाठवण्यात आली आहेत.

संस्थांनी या उमेदवारांची मुलाखतीची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची आहे. मुलाखतीद्वारे व थेट नियुक्ती अशा दोन प्रकारे ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट नियुक्तीसाठी केवळ एका, शेवगाव तालुक्यातील एका संस्थेने मागणी नोंदवली आहे.

त्यामध्ये ४ पदे आहेत. यासाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे नावे शिक्षण विभागाने या संस्थेकडे पाठवले आहेत. उर्वरित ७९ संस्थांमध्ये मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. मुलाखत घेण्याची जबाबदारी संस्थेवर सोपवण्यात आली आहे.

त्यासाठी ३० गुण निश्चित करण्यात आले आहेत. या गुणांचे वर्गीकरणही, कोणते गुण कोणत्या निकषासाठी द्यायचे आहेत, हे ठरवून दिले गेले आहे. शिक्षण संस्थेने उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यावर शिक्षण विभागाकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

दरवर्षी संचमान्यतेनंतर शिक्षण संस्थेने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बिंदू नामावली तपासून घ्यायची आहे. माहिती मागणीनुसार पवित्र पोर्टलवर भरायची आहे. त्यानुसार त्या संस्थेत पदभरतीसाठी जाहिरात तयार केली जाते,

ही जाहिरात दोन वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याचे बंधन संस्थांवर टाकण्यात आले आहे. ‘टीइएटी’ पात्रता धारकांनी नावनोंदणी केल्यानंतर गुणवत्तानिहाय यादी तयार केली जाते. या उमेदवारांनी किमान २० प्राधान्यक्रमांची नावे द्यायची आहेत.

केवळ अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्येच पवित्र पोर्टलमार्फत भरती होत आहे. शिक्षण संस्थांनी ‘पवित्र पोर्टल’वर उमेदवारांची मागणी नोंदवल्यानुसार त्यांना उमेदवार मिळाले आहेत.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योग्य पात्रतेचे शिक्षक या माध्यमातून उपलब्ध होणारा असल्याने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ही त्याची मदत होणार आहे.

इतर शिक्षण संस्थांनीही बिंदू नामावली तपासून वेळच्यावेळी पवित्र पोर्टलवर मागणी नोंदवल्यास उमेदवार त्यांनाही उमेदवार मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe