Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्षांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप खासदार कंगना राणावत यांच्या विरोधात वक्तव्य केले होते.
यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. त्यानुसार यशवंत विद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांच्यावर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विद्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर हरिभाऊ सांगळे यांनी भाजप खासदार कंगणा राणावत यांच्याबाबत चंदीगड विमानतळावर घडलेल्या घटनेचा विक्षिप्तपणे उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपमानास्पद शब्दांचा वापर केला.
याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली. त्यामुळे सांगळे आणि इतर दोघांनी ऋषिकेश कांडेकर यांना घरी जाऊन, तू निमोणमध्ये ये, तुझ्या तंगड्या तोडून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबत भाजप उपाध्यक्ष व निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांना खडेबोल सुनावले.
घटनेची माहिती भाजपचे संगमनेर तालुका विधानसभा प्रमुख अमोल खताळ, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष राजू सोनवणे, भाजप महिलाध्यक्ष कविता पाटील यांच्यासह कार्यकत्यांनी विद्यालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलन करत मुख्याध्यापकांना धारेवर धरले.
त्यांनी जाहीर माफी मागतली मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी विद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य ऋषिकेश कांडेकर यांच्या फिर्यादीवरून सांगळे यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली.