Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध साथीच्या आजाराने अगदी कहर केला आहे. चिकनगुनिया, डेंग्यू आदी आजाराने अनेक दवाखाने फुल्ल झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू ने देखील आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे.
आता अहमदनगर जिल्ह्यातील दोघांचा स्वाईन फ्ल्यू आजाराने मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील गणोरे व पाडाळणे येथील हे दोन रुग्ण आहेत.
दरम्यान, राजूर येथील एका स्वाईन फ्ल्यू रुग्णावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुक्यामध्ये डेंग्यूचे सात, चिकुनगुनिया दोन तर काही स्वाइन फ्लू सदृश्य रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागासह राजूर, अकोले शहरात मुख्य चौकांसह भरवस्तीत अस्वच्छता, साठलेले डबके व कचरा यास काही अंशी नागरिकच जबाबदार असले तरी तोकडी यंत्रणाही तितकीच जबाबदार ठरत आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागासह शहरात डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सर्व ठिकाणी प्रशासनाकडून मलमपट्टी करताना अडचणी येत आहेत. घरात कोणी आजारी पडले की, तात्पुरत्या होणाऱ्या स्वच्छतेमध्ये सातत्य नसते. अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी यंत्रणा सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे.
दैनंदिन कचरा गाडी दारात येऊनही रस्त्यावर कचरा फेकणारे काही नागरिक आहेत. स्वच्छता करणारी अकुशल तोकडी यंत्रणा व कचरा गाडीतील ओला-सुका कचरा विलगीकरणाची ओरड येथील आरोग्य बिघडवित असल्याचे समोर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आरोग्यासारख्या गंभीर प्रश्नावर नगरपंचायत व ग्रामपंचायत, मनपा यापैकी कोणीही ठोस मार्ग काढू शकले नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. तापाने फणफणारे रुग्ण अकोले तालुक्यात स्वाइन फ्लू सदृश,
चिकनगुणिया, डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ होत आहे. डासांच्यामुळे तापाने फणफणारे रुग्ण रूग्णालय, क्लिनिकमध्ये आढळतात. हे जिल्ह्याच्या दृष्टीने गांभीर्याची गोष्ट आहे.