जेव्हा कोणतीही व्यक्ती कार घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रामुख्याने तीन-चार गोष्टी अगदी पक्क्या असतात. यातील पहिली म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये मिळणारी चांगली वैशिष्ट्ये असलेली कार, तसेच कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे या दृष्टिकोनातून कुटुंबाला जर कुठे फिरायला जायचा प्लॅन राहिला तर सगळ्यांना एकत्र जाता येईल अशा प्रकारची कार घेण्याचा विचार प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो.
कुठे फिरायला जायचे असेल तर मोठी कार असणे खूप गरजेचे असते. या दृष्टिकोनातून भारतीय कार बाजारपेठेमध्ये काही प्रकारच्या सात आणि आठ सीटर कार उपलब्ध आहेत.
परंतु जर तुम्हाला यापेक्षा देखील जास्त आसन क्षमता असलेली कार घ्यायची असेल तर भारतीय कार बाजारपेठेमध्ये उत्तम अशी दहा सीटर कार दाखल झाली असून याच कारची माहिती आपण या लेखात घेऊ.
फोर्स कंपनीची ‘फोर्स सिटीलाईन’ कार आहे फॅमिलीसाठी उत्तम
फोर्स मोटर्स ही भारतातील एक प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी असून काही काळापूर्वी या कंपनीने भारतातील पहिली 10 सीटर पॅसेंजर कार लॉन्च केली होती व या कारला फोर्स सिटीलाईन असे नाव देण्यात आलेले आहे. फोर्स कंपनीची फोर्स ट्रॅक्स क्रुझर ही एक पसंतीची कार होती व याच कारची अपडेटेड आवृत्ती म्हणजेच फोर्स सिटीलाईन ही कार आहे.
सिटीलाईन नावाने फोर्स मोटर्स या दहा सीटर कारची विक्री भारतामध्ये करते. या कारचा आकर्षक लूक आणि पावरफुल इंजिन देण्यात आलेले असून ही एक एमपीव्ही सेगमेंट मधील कार आहे. या कारमध्ये दहा लोक अगदी आरामांमध्ये प्रवास करू शकतात.
कशी आहे या कारमधील बैठक व्यवस्था?
या गाडीमध्ये चांगली स्पेस देण्यात आलेली असून ड्रायव्हर शिवाय इतर नऊ लोक या कारमध्ये आरामात बसू शकतात. फोर्स सिटीलाईन मध्ये चार लाईन देण्यात आलेले आहेत व यातील पहिल्या लाईन मध्ये दोन प्रवासी,
दुसऱ्या रांगेत तीन प्रवासी व तिसऱ्या मध्ये दोन प्रवासी व चौथ्या मध्ये तीन प्रवासी बसू शकतात. तसेच फोर्स सिटीलाईन कारच्या दुसऱ्या रांगेला फोल्ड करता येते व आरामात तिसऱ्या आणि चौथ्या रांगेतील सीटकडे जाता येते.
या कारमध्ये देण्यात आलेली वैशिष्ट्ये व इंजिन
फोर्स सिटीलाईन कारमध्ये चार सिलेंडर,2596 सीसी क्षमतेचे इंजिन दिले असून ते पाच स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. जे ९१ बीएचपी पावर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे.
तसेच या कारमध्ये हायड्रोलिक टेलिस्कोपिक सस्पेन्शन देण्यात आलेले असून आकाराने ही कार खूप मोठी आहे. या कारची लांबी ही 5120mm, रुंदी 1818 एमएम, उंची 2027 एमएम आणि व्हीलबेस 3050 एमएम इतका असून ग्राउंड क्लिअरन्स 191मीमी आहे.
तसेच या कारमध्ये शक्तिशाली ड्युअल एअर कंडिशनिंग, सेंट्रल लॉकिंग पॉवर विंडो, मल्टिपल यूएसबी चार्जिंग पोर्ट, मागच्या बाजूला पार्किंग सेन्सर तसेच बॉटल होल्डर आणि सामानासाठी फोल्डिंग प्रकारच्या शेवटच्या रो सीट्स देण्यात आलेले आहेत.
किती आहे फोर्स सिटीलाईन कारची किंमत?
भारतामध्ये या 10 सीटर फोर्स सिटीलाईन कारची एक्स शोरूम किंमत 15 लाख 93 हजार रुपये इतकी आहे.