कर्जत – जामखेड ‘ मध्ये नगराध्यक्ष राऊत निवडणूक लढविणार ?

Ahmednagarlive24
Published:

कर्जत : प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील समर्थकांचा ९ सप्टेंबरला कर्जतमध्ये संकल्प मेळावा आयोजित केला आहे.

त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीची भूमिका जाहीर करणार आहेत. राऊत निवडणुकीत उतरल्यास पालकमंत्री राम शिंदे यांच्यासमोरील अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. राऊत हे मुळचे शिवसैनिक आहेत.

काही काळ राष्ट्रवादीतही ते गेले होते. आता ते भाजपात आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भाजपने विजय मिळवला आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या विजयातही राऊत यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ २००९ साली खुला झाला. त्यावेळी राऊत समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. मोठे शक्तीप्रदर्शन राऊत यांनी केले होते.

मात्र त्यावेळी त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर भाजपात प्रवेश केला. मात्र त्यावेळी स्व. गोपीनाथ मुंढे यांनी पुढील वेळी विधानसभेची उमेदवारी भाजपाकडून देऊ, असे सांगितल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे. मात्र तसे झाले नाही.

२०१४ साली युती तुटल्यावर राऊत यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र ते सगळे ऐनवेळी झाले. पुरेसा वेळ नसल्याने व शिवसेनेकडे उपनेते रमेश खाडे यांनी उमेदवारी मागितल्याने राऊत यांना संधी मिळाली नाही.

राऊत यांचा जनसंपर्क कर्जत व जामखेड तालुक्यात दांडगा आहे. ते स्वतः अनेक वर्षे सरपंच होते. त्यांच्या पत्नी सुवर्णाताई पंचायत समितीच्या सभापती होत्या. कर्जत नगरपंचायत आस्तीत्वात आल्यावर त्यांनी स्वत : च्या ताकदीवर भाजपचा झेंडा फडकविला.

विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा स्वत : चा असा कार्यकर्ता आहे, की जो इतर कोणत्याच नेत्याकडे दिसत नाही. असे असतानाही त्यांना आमदारकीची संधी मिळत नसल्याने समर्थक नाराज आहेत.

आता किंगमेकर न राहता स्वत:चा विचार करावा, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. आताची निवडणूक रोहित पवार आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यात होत आहे. राऊत यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यास पालकमंत्र्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment