Ahmednagar News : पावसाची अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनापासून तर आता पर्यंत मोठा पाऊस झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या बहुतांश जलाशय देखील भरले आहेत.

सरासरीमध्ये विचार केला तर १ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मुळा, भंडारदरा आदी धरण भरले असून जायकवाडी देखील भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
असे असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग असा आहे की तेथे आजही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरी देखील संगमनेर, नगर, पारनेर, पाथर्डी तालुक्यातील काही महसूल मंडळात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
संगमनेर तालुक्यातील सात गावांसह २४ वाड्या-वस्त्यांवरील ९ हजार ६१७ नागरिकांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. काही महसूल मंडळात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाई दिसून येत आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात तीव्र टंचाई स्थिती उद्भवली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करून आवश्यक ठिकाणी टँकरला मंजुरी दिली होती. मे महिन्यात टँकरची संख्या ३२० वर पोहोचली होती. जूननंतर मात्र टँकरची संख्या कमी होत गेली. २१ जुलैपर्यंत संख्या ६२ इतकी झाली होती.
१ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी २९५ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यंदा पावसाची सरासरी ४९९ मिमी झाली आहे. तसेच धरणेही शंभर टक्के भरल्याने टंचाई स्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु आजही संगमनेर तालुक्यातील ९ गावांत ५ टँकरनेच पाणीपुरवठा केला जात आहे.