अनेक वर्षांपासून खिळखिळ्या झालेल्या बॉडीतून निघणारा खडखड आवाज… गळके छत… कुठे गज नाही तर कुठे आहेत; परंतु तुटलेल्या, खिळखिळ्या झालेल्या खिडक्या… फाटके सीट… गिअर टाकताना खरं खरं असा निघणारा आवाज… अशी बिकट परिस्थिती झालेल्या लालपरीची दैना अजूनही जायला तयार नाही.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीत प्रवाशांना धक्क्यावर धक्के बसतात. असाच प्रकार बसच्या बाबतीत झाला. राहाता बस स्थानकात शिर्डीकडून संभाजीनगरला चाललेली एस.टी. महामंडळाची बस प्रवासी घेण्यासाठी आली असता, बस मागे घेताना बसचा गिअर फसला, चालकाच्या अथक प्रयत्नांनंतरही गिअरचा प्रॉब्लेम न सुटल्याने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून देण्यात आले.
ग्रामीण भागात अवस्था विकटच
त्यानंतर इतर बसला अडथळा ठरु नये म्हणून या बसला परिवहन मंडळाच्या चार कर्मचाऱ्यांनी धक्का देऊन एका बाजूला लावले. राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीची अर्थात एसटी बसची ग्रामीण भागात अवस्था विकटच दिसते. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात हजारो नवीन बस दाखल होतात; मात्र या बस शहरी भाग अथवा जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावरच धावतात.
चालकांना मोठा मनस्ताप
ग्रामीण भागात नवीन बस धावल्या नाही तर प्रवाशांना दे धक्का तसेच गळके छत, खडखड, धडधड आवाज हा कायमचा त्रास देतच राहाणार, अशीच चर्चा ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये आहे. एकीकडे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवण्याची कसरत तर दुसरीकडे जुनाट एसटी बस,
त्यामुळे ग्रामीण भागात लाल परी चालवणाऱ्या चालकांना मोठा मनस्ताप सहन कराव लागतो. गाडीची अवस्था जशी खिळखिळी झाली तशीच अवस्था अनेक प्रवाशांच्य व चालकांच्या शरीराची झाली असेल तर नवल वाटायला नको, अशी चच काही प्रवाशांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
बदललेली बसही रुसली
पहिल्यांदा प्रवासी बसले ती बस गळकी निघाली, परिणामी ती बस बदलून घेतली; मात्र बदललेली बससुद्धा दगा देऊन रुसून बसली, त्यामुळे प्रवाशांना चढ-उतार करावे लागले. याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.
ग्रामीण भागाबरोबर दुजाभाव
ग्रामीण भागात जुनाट बस धावत असल्याचे प्रवासी सांगतात. आमच्या नशिबी नवीन बसमध्ये प्रवास कधी येईल व ग्रामीणा भागात सुद्धा चांगल्या दर्जेदार नवीन बस केव्हा धावतील? हा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवासी उपस्थित करीत असून ग्रामीण भागाबरोबर कायम दुजाभाव होत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.